पहिल्याच आठवड्यात ‘क्रांतिज्योती विद्यालय’ची छप्परफाड कमाई; प्रत्येक शो हाऊसफुल

'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे शोज हाऊसफुल असून पहिल्याच आठवड्यात तगडी कमाई झाली आहे. किती कोटींची कमाई झाली, ते जाणून घ्या..

पहिल्याच आठवड्यात क्रांतिज्योती विद्यालयची छप्परफाड कमाई; प्रत्येक शो हाऊसफुल
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 11, 2026 | 9:29 AM

मराठी शाळेच्या वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक नाळ निर्माण करणारी कथा मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. सकाळी 7 वाजताचा पहिला शो असो किंवा रात्री 12 वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपलं स्थान ठामपणे अधोरेखित केलं आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये (सिंगल स्क्रीन) इतर चित्रपटांचे शो कमी करून ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चे शो वाढवले जात आहेत.

हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात 6.14 कोटी रुपयांची उल्लेखनीय कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात या यशाला आणखी वेग मिळाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. मराठी आशयप्रधान चित्रपटासाठी हा प्रतिसाद विशेष मानला जात असून, बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सतत ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकारांची कामगिरी, संगीत आणि कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत. “हेमंत ढोमे यांनी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट दिला आहे,” “शाळेतील आठवणी पुन्हा जिवंत झाल्या,” “मराठी भाषा आणि मराठी शाळेची गळचेपी कोणताही अतिरेक न करता प्रभावीपणे मांडली आहे,” अशा प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. चित्रपटाची संवेदनशील मांडणी प्रेक्षकांना भावूक करत असल्याचे अनुभव अनेकांकडून समोर येत आहेत.

या यशाबद्दल लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे. या प्रेमाने संपूर्ण टीमला नव्या उमेदीने पुढे काम करण्याचं बळ दिलं आहे.ठ

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकत आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून, क्षिती जोग या चित्रपटाची निर्माती आहेत.