मराठी शाळांचं वास्तव दाखवणारं ‘क्रांतीज्योती विद्यालय’; कसा आहे हेमंत ढोमेचा चित्रपट?
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये उत्तम कलाकारांची तगडी फौज असून हा चित्रपट एकंदरीत कसा आहे, ते जाणून घ्या..

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, विशेष म्हणजे या सर्व गोष्टींसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या प्रत्येकाकडून प्रयत्न व्हायला हवेत, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘फर्स्टक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. विशेष म्हणजे ‘क्रांतीज्योती विद्यालय’ पाहताना केवळ मराठी भाषा आणि मराठी शाळा या विषयांपुरताच चित्रपट मर्यादित असल्याचं वाटत नाही. अलिबागमध्ये या चित्रपटाची कथा घडते, त्यामुळे तिथलं देखणं निसर्गही यात पहायला मिळतो.
चित्रपटाची कथा
अलिबागमधील नागावच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय’ या मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) हे त्यांची शाळा लवकरच बंद होणार म्हणून प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांच्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या जागी एक चकचकीत इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाची शाळा बांधायचा निर्णय घेण्यात आला आहे. पडक्या शाळेच्या जागी मोठी, आधुनिक सोयीसुविधा असलेली दुसरी शाळा उभी राहणार आहे, मग त्यात अडचण काय आहे, असा शाळेच्या नावाखाली कोट्यवधी कमावण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचा सवाल आहे. तर अलिबागसारख्या गावात मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देणारी मोठी शाळा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असं पालकांचं म्हणणं आहे. तेव्हा आपला मूळ मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिर्के सर याच मराठी शाळेतून शिकून सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या निमित्ताने एकत्र आणतात.
या चित्रपटात हेमंतने पात्रांवर अधिक भर दिला आहे. या पात्रांच्या आधारे शिक्षणाकडे आणि मातृभाषेकडे पाहण्याचे विविध दृष्टीकोन त्याने कथेत मांडले आहेत. मराठी भाषा, मराठ भाषा यासंबंधीची सद्यस्थिती, प्रश्न, वास्तव या चित्रपटातून समोर येतात. या चित्रपटाचा विषय जरी सामाजिक असला तरी तो उपदेशपर वाटू नये, यासाठी हेमंतने पूर्ण प्रयत्न केले आहेत. उत्तम कलाकार आणि त्यांचं दमदार अभिनय ही या चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू ठरते. सचिन खेडेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, चिन्मयी सुमित, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारल्या आहेत. चित्रपटाचा मूळ विषय अत्यंत चोख मांडण्यात आला आहे. हेमंत ढोमेनं रंजक पद्धतीने विषयाचं गांभीर्य जाणवून दिलं आहे. हा चित्रपट पाहताना प्रत्येक प्रेक्षकाला त्याची मराठी शाळा आठवल्याशिवाय राहणार नाही.
