बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘क्रांतीज्योती विद्यालय’चा बजेट किती? कमाईचा आकडा तिप्पट

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बजेटच्या तिप्पट कमाई केली आहे. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत.

बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या क्रांतीज्योती विद्यालयचा बजेट किती? कमाईचा आकडा तिप्पट
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 22, 2026 | 8:53 AM

मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला आपलंसं केलं. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना थेट भिडल्या. राज्यभरातील अनेक शाळा आणि शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत सामूहिक शोज आयोजित केले आहेत. माजी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही चित्रपट पाहाताना दिसत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत बजेटच्या तिप्पट कमाई केली आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चा निर्मिती खर्च हा 6.50 कोटी रुपये असून या चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटी रुपयांच्या वर कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने मराठी माणसांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नव्यानं बळ दिलं आहे. मराठी माध्यम शाळांविषयी असलेली न्यूनगंडाची भावना दूर करत, ‘आपली शाळा, आपली भाषा आणि आपली ओळख’ याचा अभिमान पुन्हा जागा केला आहे. चित्रपट संपल्यानंतर दिसणारे टाळ्यांचे गजर, भारावलेले चेहरे आणि डोळ्यांतला विश्वास यावरूनच या चित्रपटाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. सकाळी 7 वाजताचा पहिला शो असो किंवा रात्री 12 वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपलं स्थान ठामपणे अधोरेखित केलं आहे.

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “आम्ही हा चित्रपट करताना फक्त एक गोष्ट मनात ठेवली होती, मराठी शाळेची कथा प्रामाणिकपणे सांगायची. आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा चित्रपट पाहून जे बळ घेत आहेत, त्यातूनच मला वाटतं की, या सगळ्या जागृतीमुळे शिक्षण व्यवस्थेलाही याची जाणीव होईल. आपल्या मराठी शाळा टिकाव्यात, फुलाव्यात आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात, हीच एकमेव आशा आणि इच्छा या चित्रपटामागे होती.”

या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे.