Kriti Sanon : माझा ब्लाउज राष्ट्रीय चर्चेचा विषय…रक्षाबंधन जाहिरातीच्या ट्रोलिंगवर क्रिती सेनन स्पष्टच बोलली
Kriti Sanon : क्रिती सेननला रक्षाबंधनच्या जाहिरातीमधील कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलेलं. त्यावर आता अभिनेत्रीनं भाष्य केलं आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन अलीकडेच करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या शोमध्ये दिसली. यादरम्यान क्रितीनं ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. क्रिती म्हणाली, ‘मी एक बॉस आहे. मी कोणत्याही ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही. ते काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही. मला स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही, कारण मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. मी ते सोडून देते. मी त्यांना काहीही बोलत नाही. मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.’
क्रिती सेननचं वक्तव्य चर्चेत
क्रिती पुढे म्हणाली की, ‘पण अलीकडे जे घडलं ते म्हणजे माझा ब्लाउज राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. माझा विश्वासच बसत नव्हता, माझ्या ब्लाउजवर प्राइम-टाइम न्यूजमध्ये सहा जणांची पॅनल चर्चा झाली आणि मला वाटलं, हे काय चाललंय? सहसा, मी काहीही बोलत नाही. तुम्हाला माहीत आहे, हे ट्रोलिंग त्या आधीपासूनच सुरू झालं होतं आणि तेव्हाच मला वाटलं की मला थोडं ‘बॅडी’ बनावं लागेल.’
‘मला असं वाटलं नाही की, हा माझ्याबद्दलचा मुद्दा आहे. हा एक खूप मोठा मुद्दा आहे. मला वाटतं की, महिलांना प्रत्येक गोष्टीसाठी सतत पारखलं जातं आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी महिलांनाच टार्गेट केलं जातं. तुला काय घालायचं आहे? ती खूप बुटकी आहे, खूप उंच आहे, तिचं वजन वाढलं आहे, ती खूप बारीक दिसते, अरे, ती गरोदर आहे का? असं म्हटलं जातं. मला वाटतं, महिलांनी स्वतःसाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीवर खूप प्रश्न विचारले जातात. आणि या लोकांना आमच्यावर कमेंट करण्याचा अधिकार कोणी दिला, कशासाठी?’
जे लोक स्त्रियांच्या दिसण्यापासून ते त्यांच्या कपड्यांच्या निवडीपर्यंत त्यांच्यावर नजर ठेवतात, ते अनेकदा वैयक्तिक मतांच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना टार्गेट करतात आणि कधीकधी त्यांच्या कुटुंबांवरही प्रभाव टाकतात, असंही क्रिती सेनन म्हणाली.
