
Kunickaa Sadanand and Kumar Sanu : ‘बिग बॉस 19’च्या पहिल्या एपिसोडपासून अभिनेत्री कुनिका सदानंद तुफान चर्चेत आहे. शोमध्ये कुनिका तिच्या बेधडक स्वभावामुळे इतर स्पर्धकांशी पंगा घेताना दिसतेय. अशातच कुनिकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत कुनिका इतर अभिनेत्रींवर टीका करताना दिसतेय. बॉलिवूडमध्ये बलात्कार होत नाहीत, तर अभिनेत्री निर्माते-दिग्दर्शकांना हिंट्स देतात, अशी गंभीर टिप्पणी तिने या मुलाखतीत केली होती.
“मी असं मानते की आमच्या इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत. कुठेतरी मुलीकडूनही एक इशारा असतो. आता जसं मी तुमच्याकडे कामासाठी आली आणि विचारलं की, सर मला तुमच्यासोबत काम करायचं आहे, एखादा रोल असेल तर सांगा. हे एक झालं”, असं ती म्हणते. त्यानंतर ती अभिनेत्रींच्या दुसऱ्या व्हर्जनकडे लक्ष वेधते. कशापद्धतीने बोलण्याचा सूर बदलून समोरच्या व्यक्तीला इशारे दिले जातात, याविषयी सांगते. त्याचवेळी सिद्धार्थ तिला सांगतो की त्यानेही अभिनेत्रींना दिग्दर्शकाची कॉलर ठीक करताना पाहिलंय. तेव्हा कुनिका पुढे उदाहरण सांगते, “तुम्ही असं म्हणालात तर.. जी व्यक्ती सरळ आणि थेट राहिली, तिच्यावर कधीच मी बलात्कार झाल्याचं ऐकलं नाही. मी नेहमी स्पष्ट आणि थेट वागते. बॉस, मला कोणत्याही किंमतीवर हिरोइन बनायचं नाहीये.”
कुनिकाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यातच गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने तिच्यावर टीका केली. कुनिका आणि कुमार सानू हे एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. कुनिकाशी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना कुमार सानू विवाहित होते. यावरून जानने तिला टोमणा मारला आहे. “तिने स्वत:शी आयुष्यभर हेच केलंय. विवाहित पुरुषासोबत आणि जिथे जिथे तिला संधी मिळेल तिथे. फार तोंड उघडू नकोस, अन्यथा बरीच धोतरं सुटतील”, असं त्याने लिहिलं.
नव्वदच्या दशकात कुमार सानू यांच्यासोबतच्या अफेअरमुळे कुनिका प्रकाशझोतात आली होती. सानू त्यावेळी विवाहित होते, परंतु त्यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या होत्या. तेव्हा कुनिकाने त्यांची साथ दिली आणि हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघं नंतर एकत्र नवरा-बायकोसारखे राहू लागले होते. कुमार सानू जगभरात जिथे जिथे कॉन्सर्टला जायचे, तिथे ती त्यांच्यासोबत जायची.