प्रदर्शनापूर्वीच सलमानच्या ‘सिकंदर’ला मोठा धोका; मोहनलाल यांच्या ‘एल 2: एम्पुरान’चा धुमाकूळ

अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला मोहनलाल यांच्या चित्रपटाकडून मोठा धोका निर्माण झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली असून प्रेक्षकांची क्रेझ वाढली आहे.

प्रदर्शनापूर्वीच सलमानच्या सिकंदरला मोठा धोका; मोहनलाल यांच्या एल 2: एम्पुरानचा धुमाकूळ
L2 Empuraan
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 28, 2025 | 12:47 PM

पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘एल 2: एम्पुरान’ या मल्याळम चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 27 मार्च रोजी हा बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मल्याळमसोबतच हा चित्रपट हिंदी आणि इतर दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकड्याने सर्वांनाच थक्क केलंय. मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लुसिफर’चा दुसरा भाग आहे. ‘लुसिफर’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. अॅक्शन आणि थराराने परिपूर्ण असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 22 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘एल 2 : एम्पुरान’ या चित्रपटाने भारतात 22 कोटी रुपये कमावले असून त्यापैकी 19.45 कोटी रुपयांची कमाई ही मल्याळम भाषेतून आहे. तर कन्नडमधून 0.05 कोटी रुपये, तेलुगूमधून 1.2 कोटी रुपये, तमिळ भाषेतून 0.8 कोटी रुपये आणि हिंदीतून 0.5 कोटी रुपयांची कमाई झाली. या चित्रपटाने मागच्या सर्व मल्याळम चित्रपटांच्या रेकॉर्डला मागे टाकलं आहे. यासोबतच प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांचेही विक्रम मोडले आहेत. ‘आझाद’, ‘इमर्जन्सी’, ‘लवयापा’, ‘मेरे हसबंड की बीवी’, ‘फतेह’, ‘बॅडअॅस रविकुमार’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.

‘एल 2: एम्पुरान’ या चित्रपटाच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच 30 मार्च रोजी सलमान खानचा ‘सिकंदर’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘गजिनी’ फेम ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटाविषयीही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. परंतु मल्याळम चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी चांगली झाली तर त्याचा फटका सलमान खानच्या चित्रपटालाही बसू शकतो.

‘एल 2: एम्पुरान’ या चित्रपटाचं बजेट 180 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. बजेटचा हा आकडा अवघ्या काही दिवसांतच चित्रपटाकडून पार होईल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट ‘केजीएफ’, ‘सालार’, ‘बाहुबली’, ‘पुष्पा’ यांसारख्या पॅन इंडिया चित्रपटांच्या यादीत सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.