लता मंगेशकरांनी बहिणीसोबत गायलेलं गाणं, 71 वर्षानंतर देखील कोणालाच माहिती नाही अर्थ, आजही सुपरहिट
लता मंगेशकर यांनी बहीण उषा यांच्यासोबत 71 वर्षांपूर्वी गायलेलं हे गाणं. ठरलं प्रचंड सुपरहिट. आजपर्यंत कोणालाच या गाण्यातील शब्दांचा अर्थ समजला नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या गाण्यांचा विषय निघाला की त्यांच्या सुरेल चाली आणि लक्षवेधी शब्दांची आठवण नक्कीच होते. अनेकदा गाण्यांमध्ये असे काही गंमतीदार आणि लयबद्ध शब्द वापरले जातात, ज्यांचा ठराविक शाब्दिक अर्थ नसतो; मात्र तेच शब्द गाण्याला वेगळी ओळख मिळवून देतात. असंच एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘अपलम चपलम’.
सन 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आजाद’ या चित्रपटातील ‘अपलम चपलम’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या गाण्याचे बोल गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते. त्यांच्या लेखणीतून ‘मेरे सामने वाली खिड़की में’, ‘पल पल दिल के पास’, ‘एक चतुर नार’, ‘मन डोले मेरा तन डोले’ आणि ‘सुख के सब साथी, दुख में ना कोय’ यांसारखी अनेक गाजलेली गाणी हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाली.
‘अपलम चपलम’चा अर्थ काय?
या गाण्याची सर्वाधिक उत्सुकता निर्माण करणारी गोष्ट म्हणजे त्यातील ‘अपलम चपलम’ हे शब्द. या शब्दांचा कोणताही ठराविक शाब्दिक अर्थ नसला, तरी गाण्यात ते चुलबुले, खट्याळ आणि मस्तीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी वापरले गेले आहेत. गाण्याच्या लयीत आणि तुकबंदीत हे शब्द अगदी सहज मिसळतात आणि त्यामुळे गाण्याला एक वेगळीच मजेशीर रंगत मिळते.
दोन बहिणींनी दिला आवाज
‘अपलम चपलम’ हे गाणं लता मंगेशकर आणि त्यांच्या धाकट्या बहीण उषा मंगेशकर यांनी एकत्र गायले होते. दोन्ही बहिणींच्या आवाजातील सुरेल जुगलबंदीमुळे या गाण्याला विशेष लोकप्रियता मिळाली. गाण्याला संगीत सी. रामचंद्र यांनी दिले होते. आकर्षक आणि वेगवान चालींसाठी ओळखल्या जाणाऱ्या सी. रामचंद्र यांच्या संगीतामुळे गाण्याला अधिकच उत्साही रंग मिळाला.
विशेष म्हणजे पडद्यामागे दोन बहिणींनी आपल्या आवाजातून गाणं गाजवलं तर पडद्यावरही दोन बहिणींची जोडी पाहायला मिळाली. या गाण्यात लोकप्रिय नृत्यांगना जोडी साई आणि सुब्बुलक्ष्मी यांनी नृत्य सादर केले होते. भरतनाट्यममध्ये प्रशिक्षित असलेल्या या दोघी 1950-60 च्या दशकात त्यांच्या वेगवान, अचूक आणि समन्वयपूर्ण नृत्यशैलीसाठी ओळखल्या जात होत्या.
या गाण्याची नृत्यरचना हीरालाल यांनी केली होती. भन्नाट चाल, हटके शब्द, लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांचा आवाज आणि पडद्यावरील दमदार नृत्य यामुळे ‘अपलम चपलम’ हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटसंगीतातील एक लक्षवेधी गाणं म्हणून आठवलं जातं.