माधुरी दीक्षितचा नवरा दर महिन्याला किती पैसे कमावतो?

लग्नानंतर माधुरी तिच्या पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली होती. जवळपास दहा वर्षांनंतर ती पुन्हा भारतात परतली आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. माधुरीचा पती दर महिन्याला किती कमावतो हे तुम्हाला माहीत आहे का?

माधुरी दीक्षितचा नवरा दर महिन्याला किती पैसे कमावतो?
Madhuri Dixit and Dr Shriram Nene
Image Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2025 | 3:43 PM

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. ऑक्टोबर 1999 मध्ये लग्न केल्यानंतर माधुरी अमेरिकेतील डेन्वर याठिकाणी स्थायिक झाली. तिथे ती जवळपास दहा वर्षे राहिली. त्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये ती तिच्या कुटुंबीयांसह भारतात परतली आणि इथे पुन्हा अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. माधुरी तिच्या कारकिर्दीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होते. तर तिचे पती डॉ. श्रीराम नेनेसुद्धा कमाईच्या बाबतीत काही मागे नव्हते. ते फक्त हृदयरोगतज्ज्ञ नव्हते तर एक दूरदर्शी उद्योजकदेखील होते. अमेरिकेत यशस्वी सर्जन म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी भारतातील डिजिटल आरोग्यसेवा क्षेत्रात पाऊल ठेवलं.

श्रीराम नेनेंनी पाथफाइंडर हेल्थ सायन्सेस कंपनी सुरू केली. इतकंच नाही तर त्यांचा आयआयटी जोधपूरच्या सल्लागार मंडळातही समावेश होता. माधुरीची एकूण संपत्ती ही जवळपास 250 कोटी रुपयांच्या घरात असून डॉ. श्रीराम नेने हेसुद्धा 100 ते 150 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. या दोघांनी संपत्ती मिळून 350 ते 400 कोटी रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीराम नेने यांचं वार्षिक उत्पन्न 98 लाख रुपये आहे. म्हणजेच ते दर महिन्याला सात लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात.

माधुरीने आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. गेल्या वर्षी ती ‘भुल भुलैय्या 3’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने 400 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. गेल्या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. तर माधुरी एका चित्रपटासाठी जवळपास चार ते पाच कोटी रुपये मानधन स्वीकारते.

लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याबद्दल माधुरीने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “मी खूप खुश होते, कारण माझ्यासाठी हा सगळा लवाजमा महत्त्वाचा नव्हता. मी जे करायची ते मला आवडत होतं. मला अभिनय, नृत्य आणि माझ्या करिअरमध्ये जे काही केलं, ते सर्व आवडत होतं. माझा त्या सगळ्यात खूप रस होता. त्यासोबत मिळणाऱ्या इतर गोष्टी या केवळ मी बोनस म्हणून पाहते. लोक मला स्टार समजतात, हे माझ्यासाठी बोनस आहे. पण मी स्वत:कडे कधीच त्या दृष्टीने पाहत नाही. त्यामुळे माझ्यासाठी असं कधीच नव्हतं की, अरे देवा.. मी आता प्रकाशझोतात नसेन. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न करतेय. मी कधीच अशा दृष्टीने विचार केला नाही”, असं ती म्हणाली होती.