यासमोर महाभारतही फेल..; कपूर कुटुंबाच्या संपत्ती वादावर भडकलं सुप्रीम कोर्ट

दिवंगत बिझनेसमन संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान आता त्यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणासमोर महाभारतही लहान वाटत आहे, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी यावेळी केली.

यासमोर महाभारतही फेल..; कपूर कुटुंबाच्या संपत्ती वादावर भडकलं सुप्रीम कोर्ट
संजय कपूर यांचं कुटुंब
Image Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 11:23 AM

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू झालेला वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. आता त्यांच्या 80 वर्षीय आई राणी कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली आहे. मध्यस्थी प्रक्रियेचा निकाल लागेपर्यंत संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरसह इतर काही प्रतिवादींनी आरके फॅमिली ट्रस्टच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे. तसंच 18 मे रोजी नियोजित केलेल्या रघुवंशी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी “आपण एका मोठ्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. महाभारत यासमोर खूपच लहान वाटत आहे. आम्ही याचा सखोल विचार करू”, असं न्यायाधीश म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे. बी. परडीवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाची सुनावणी 14 मे रोजी होणार आहे.

संजय कपूर यांच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वाद सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे. करिश्माने तिच्या मुलांमार्फत याचिका दाखल करत प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले होते. प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात फेरफार केल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. याआधी उच्च न्यायालयानेही संजयच्या कुटुंबीयांना फटकारलं होतं. कौटुंबिक भांडणं रस्त्यावर आणू नका, उलट ते शांततेनं आणि सामंजस्यानं सोडवण्याचा प्रयत्न करा, असं न्यायाधीशांनी म्हटलं होतं.

संजय कपूरचं गेल्या वर्षी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं होतं. तेव्हापासून त्याच्या संपत्तीवरून कुटुंबीयांमध्ये वाद सुरू आहे. संजयच्या संपत्तीवरून आई राणी कपूर, पूर्व पत्नी करिश्मा कपूर, करिश्मा-संजयची दोन मुलं आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर आमने-सामने आहेत. संजय हे खूप मोठे उद्योगपती होते. ते सोना कॉमस्टार या कंपनीचे अध्यक्ष होते. जून 2025 मध्ये पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं होतं. संजय यांची संपत्ती तब्बल 30 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 2016 मध्ये करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजय यांनी 2017 मध्ये मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. संजय यांच्या निधनानंतर करिश्माने तिच्या दोन मुलांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून प्रिया सचदेववर काही आरोप करण्यात आले होते.

Follow Us