मधमाशीने नाही तर ‘या’ कारणामुळे झालं करिश्मा कपूरच्या पूर्व पतीचं निधन
संजय कपूरच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मधमाशी गिळल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं. परंतु आता त्यामागील खरं कारण समोर आलं आहे. ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे कारण स्पष्ट केलं आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून 2025 रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पोलो खेळताना संजयच्या तोंडात मधमाशी गेली आणि तिने घशात चावा घेतल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली, असं म्हटलं गेलं होतं. त्यातूनच त्याला हृदयविकाराचा झटका आला. आता त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पत्नी प्रिया सचदेव कपूरला लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे. संजयचं निधन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं सरे कोरोनर ऑफिसने स्पष्ट केलंय. त्याच्या निधनाचं कारण लेफ्ट वेंट्रिकुलर हाइपरट्रॉफी (एलवीएच) आणि इस्केमिक हृदयरोग सांगितलं गेलंय.
LVH ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या वेंट्रिकुलरच्या स्नायूंची भिंत जाड होते, ज्यामुळे रक्त प्रभावीपणे पंप करणं कठीण होतं. या स्थितीत हृदयाला सामान्यापेक्षा जास्त काम करावं लागलं. तर इस्केमिक हृदयरोगात हृदयाच्या स्नायूंना पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. हे सहसा रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे होतं. त्यामागचं सामान्य कारण एथेरोस्क्लेरोसिस आहे. ज्यामध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ धमनीच्या भिंतींवर जमा होतात.
संजय कपूरच्या मृत्यूप्रकरणात कोरोनरच्या कार्यालयाने पुढे स्पष्ट केलंय की, “या आधारांवर कोरोनर अँड जस्टिस अॅक्ट 2009 च्या कलम 4 अंतर्गत तपास बंद करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपासाची आवश्यकता राहणार नाही.” यावरून असं सिद्ध होतंय की संजय कपूरच्या मृत्यूमागे कोणतंही कटकारस्थान नव्हतं, असं प्रिया सचदेव कपूरच्या जवळच्या सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. काही दिवसांपूर्वीच संजयची आई राणी कपूर यांच्याकडेही हा अहवाल सोपवण्यात आला होता. तरीसुद्धा त्यांनी मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरवर आर्थिक फायद्यासाठी कट रचल्याचा आरोप केला आहे.
संजयच्या निधनानंतर आता प्रिया सचदेवने तिच्या नावापुढे ‘कपूर’ असं आडनाव जोडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचं नाव प्रिया एस. कपूर असं बदललं आहे. विशेष म्हणजे ती आता ‘सोना कॉमस्टार’ या कंपनीच्या बोर्डातही सहभागी झाली आहे. या कंपनीच्या अध्यक्षपदी संजय कपूर होता. आता त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीतून प्रिया, सफिरा आणि करिश्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
