Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ वरून नवा वाद, सिनेमाच्या नावामुळे 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का!
Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ सिनेमाचे वाद आता टोकाला पोहचले आहेत. सिनेमामुळे 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवल्याचा दावा करण्यात आला असून आता काय होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ सिनेमाची घोषणा जेव्हा करण्यात आली, तेव्हापासून सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. आज म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमाच्या नावावरुन सुरु असलेले वाद अद्यापही शमलेले नाहीत. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या नावावर आक्षेप घेत नाव बदलेपर्यंत सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करण्यात येत आहे. हे वाद आता कोर्टात देखील पोहोचले असून नवे वाद निर्माण झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी सिनेमाच्या नावावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. सिनेमाच्या नावाला आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
सिनेमाचं नाव बदलेपर्यंत त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती किशोर संत आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी गुरुवारी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून, 4 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सिनेमाच्या प्रदर्शनावर या याचिकेचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागलं आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर सिनेमाची कथा आधारलेली आहे. पण सिनेमात वापरण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र’ शब्दामुळे राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेकांनी सिनेमाच्या नावाचा विरोध केलं. . संभाजी ब्रिगेड, मराठा विकास मंच, हिंदू सेवा संघ यांनी सिनेमाचं नाव न बदलल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सांगायचं झालं तर, ‘एपस्टिन फाईल्स’ प्रकणात अनेक दिग्गज व्यक्तींची नावे समोर आलेली. जेफ्री एपस्टीन हे नाव जगभरात कुप्रसिद्ध आहे. लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमुळे त्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं होतं. ज्यामुळे जगभरात खळबळ माजली होती.
