असंख्य चित्रपटांच्या गर्दीत असा एखादा बनतो, जो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आणि सर्वत्र त्याचीच चर्चा होऊ लागते. अशीच कमाल दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस ‘होम्बाले फिल्म्स’च्या एका चित्रपटाने केली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘महावतार नरसिम्हा’. या ॲनिमेटेड चित्रपटाची कथा पौराणिक आहे. ही कथा अनेकांना आधीपासूनच माहीत आहे. तरीसुद्धा त्याची मांडणी, चित्रपटातील संवाद, दृश्ये आणि जबरदस्त ॲनिमेशन यांमुळे ‘महावतार नरसिम्हा’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. प्रदर्शनाच्या अवघ्या सहा दिवसांत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतोय. या यशामागची पाच महत्त्वाची कारणं जाणून घेऊयात..
पौराणिक कथेचा सार- ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटात भगनाव विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. भक्त प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याचे वडील असुर हिरण्यकश्यपचा वथ करण्यासाठी विष्णू नरसिम्हाचा अवतार घेतात. अश्विनी कुमार यांनी या चित्रपटाचं जबरदस्त दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचा संपूर्ण अनुभव अलौकिक आणि अद्भुत वाटतो.
दमदार VFX- हा चित्रपट ॲनिमेटेड असल्याने त्यात व्हिज्युअल इफेक्ट्स व्हीएफएक्सचंच मुख्य काम आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटाचं VFX आहे, ते पाहून तुम्ही सहज म्हणू शकता की याबाबतीत होम्बाले फिल्म्सने हॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेमॅटिक युनिव्हर्स मार्वललाही मागे टाकलंय. चित्रपटाच्या यशात VFX चा खूप मोठा वाटा आहे.
पार्श्वसंगीत- या चित्रपटात एकापेक्षा एक दमदार सीन्स तर आहेतच, शिवाय त्यातील पार्श्वसंगीतानेही प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. क्लायमॅक्स असो, युद्धाची दृश्ये असो किंवा इतर भावनिक क्षण असो.. पार्श्वसंगीताने त्यात आणखी रंगत आणली आहे.
मर्यादित प्रमोशन- या चित्रपटाच्या यशामागचं आणखी एक कारण म्हणजे निर्मात्यांनी त्याचा गाजावाजा न करता मर्यादित प्रमोशनवर अधिक भर दिला. चित्रपटाच्या पोस्टर्स, टीझर आणि ट्रेलरमधून संपूर्ण कंटेटची जाणीव दिली नाही. त्याचसोबत कोणतेही मोठमोठे प्रमोशनल कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले नाहीत. फक्त सोशल मीडियाद्वारे निर्मात्यांना हा खेळ खेळला आणि त्यात ते यशस्वी ठरले.
मर्यादित बजेट- ‘महावतार नरसिम्हा’ने प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 15 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. मर्यादित बजेटचा हा फंडा निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरला आहे.