कसलाच गवगवा, प्रमोशन नाही.. तरी या चित्रपटाची 3 दिवसांत बजेटच्या 7 पट कमाई; समोर ‘सैय्यारा’ही फिका
Mahavatar Narsimha Box Office Collection Day 3: कसलाच गवगवा न करता, जोरदार प्रमोशन न करता 25 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या सातपट कमाई केली आहे.
18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैय्यारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरभक्कम कमाई केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही याचीच चर्चा आहे. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कमाई आता 300 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. परंतु ‘सैय्यारा’ला मात देण्यासाठी 25 जुलै रोजी एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कसलाच गवगवा केला नाही किंवा प्रमोशनवर कोट्यवधी रुपये खर्च केले नाहीत, तरीसुद्धा प्रेक्षकसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे वळतोय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. सर्वच वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचं नाव आहे ‘महावतार नरसिम्हा’. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने सात पटीने अधिक कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकड्यांनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 4.6 कोटींवर पोहोचला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.5 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने भारतात 15.93 कोटी रुपये कमावले आहेत. तर जगभरातील कमाईचा आकडा 29.09 वर पोहोचला आहे. या ॲनिमेटेड चित्रपटाचा बजेट चार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाची निर्मिती होम्बाले फिल्म्सने केली आहे. ‘होम्बाले फिल्म्स’ ही कन्नड सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखली जाते. यामध्ये ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चाही समावेश आहे. याशिवाय ‘केजीएफ 1’ आणि ‘केजीएफ 2’, ‘सलार- पार्ट 1 – सीझफायर’ यांसारख्या चित्रपटांचीही निर्मिती या संस्थेनं केली आहे. या यादीत आता ‘महावतार नरसिम्हा’चाही समावेश होणार आहे.
‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटात भक्त प्रल्हादची कथा दाखवण्यात आली आहे. प्रल्हादच्या भक्तीमुळे वाईटाचा पराभव करण्यासाठी भगवान विष्णू नरसिंहाचा अवतार घेतात आणि हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध करतात. या चित्रपटांसोबत इतर सात भागांची फिल्म फ्रँचाइजी सुरू झाली आहे. हे सात चित्रपट पुढील 12 वर्षांत प्रदर्शित होणार आहेत. 2037 मध्ये ‘महावतार कल्की- भाग 2’सह या फ्रँचाइजीचा शेवट होईल. त्याआधी ‘महावतार परशुराम’ (2027), ‘महावतार रघुनंदन’ (2029), ‘महावतार द्वारकाधीश’ (2031), ‘महावतार गोकुळानंद’ (2031) आणि ‘महावतार कल्की- भाग 1’ (2035) हे चित्रपट प्रदर्शित होतील.
