7 कोटी रुपयांचा मराठी सिनेमा, कमावला तब्बल 457% नफा; नाना पाटेकरांच्या अभिनयाची जादू
नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आजही हा चित्रपट पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ सुरू आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुला’, ‘द महाराष्ट्र फाइल्स’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सोडता इतर सर्व अत्यंत माफक बजेटमध्ये बनलेले चित्रपट आहेत. तरीही या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला नफा कमावला आहे. असाच एक चित्रपट जवळपास दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट नाना पाटेकर यांच्या करिअरमधील सर्वांत यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. यामध्ये महेश मांजरेकर यांच्या पत्नीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव ‘नटसम्राट’ असं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. प्रसिद्ध मराठी नाटक ‘नटसम्राट’यावर हा चित्रपट आधारित होता. उत्कृष्ट कथा, उत्तम दिग्दर्शक आणि दमदार कथानकाच्या जोरावर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटाचं बजेट फक्त सात कोटी रुपये होतं, असं कळतंय. तर बॉक्स ऑफिसवर ‘नटसम्राट’ने तब्बल 42 ते 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्या काळातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. म्हणजेच एकूण गुंतवणुकीवर या चित्रपटाने 32 कोटी रुपयांवर परतावा मिळवला होता. तर ‘नटसम्राट’ने जवळपास 457 टक्के नफा कमावला होता. या चित्रपटात नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकर यांच्यासोबत विक्रम गोखले, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे आणि अजीत परब यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘नटसम्राट’ या चित्रपटाचा यश पाहिल्यानंतर त्याचं इतर भाषांमध्येही रिमेक करण्यात आला. 2018 मध्ये या चित्रपटाचं गुजराती भाषेत रिमेक झाला. तर 2023 मध्ये ‘रंगमार्तंड’ या नावाने तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. कुसुमाग्रज यांच्या अजरामर ‘नटसम्राट’ या नाटकावर हा चित्रपट आधारित होता. उतारवयातील एकाकीपणा आणि परकेपणाचा सामना करणाऱ्या गणपत अप्पा बेलवलकर या ज्येष्ठ रंगमंच कलाकाराची हृदयस्पर्शी कथा यात दाखवण्यात आली आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला दहापैकी 8.8 अशी उत्तर रेटिंग मिळाली आहे.