Bigg Boss 20: अंतर्वस्त्रही धुवायला सांगितलं नाही, नशीब; ‘बिग बॉस 20’मध्ये पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा, माही विजच्या बॉसगिरीवर वैतागले स्पर्धक
Bigg Boss 20: बिग बॉसचा विसावा सिझन नुकताच सुरू झाला असून पहिल्याच दिवशी घरात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळणार आहे. अभिनेत्री माही विजच्या बॉसगिरीवर घरातील इतर स्पर्धक वैतागले आहेत.

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला असून घरात 16 स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. शो सुरू होताच स्पर्धकांमध्ये मैत्री, मतभेद आणि वादांची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री माही विज पहिल्याच दिवसापासून चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये माही घरातील इतर सदस्यांना काहीशा हुकूमशाही अंदाजात सूचना देताना दिसत आहे. तिच्या या वागण्यामुळे काही स्पर्धक नाराज झाल्याचं पाहायला मिळतं. प्रोमोमध्ये माही विज घरातील कामं आणि दैनंदिन गोष्टींबाबत इतर सदस्यांना सूचना देताना दिसते.
कोण काय काम करणार, घरातील व्यवस्था कशी असावी, याबाबत ती थेट बोलताना दिसते. तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे काही स्पर्धकांना तिचा हा अंदाज पसंत पडलेला नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवसापासून वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माहीच्या या वागण्यावरून घरातील काही सदस्यांनी तिच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अमन गांधी, ईशा रिखी आणि अरिश्फा खान यांच्यासोबत तिचे मतभेद होताना दिसत आहेत. घरकाम आणि चहासारख्या छोट्या मुद्द्यांवरूनही वादाची ठिणगी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
पहा प्रोमो-
🚨 Tomorrow’s Promo – And on the very first day, Mahhi Vij’s behaviour starts irritating the contestants as she goes around ordering everyone! #BBTak #BiggBoss20 pic.twitter.com/Ee8o3VKYln
— BBTak (@BiggBoss_Tak) September 6, 2026
‘बिग बॉस 20’च्या प्रोमो व्हिडीओमध्ये माही विज घरातील सर्वांशी पंगा घेताना दिसत आहे. माही ईशा रिखी, जी नुकतीच बादशाहसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे चर्चेत होती, तिला विचारताना दिसते, “ईशा, तुला चांगली चहा बनवता येते का?” यावर ईशा म्हणते, “येते, पण…” एवढ्यात माही पुन्हा म्हणते, “अगं, तुम्ही मुली आहात, चहा तर बनवता येत असेल ना?” यावर ईशा तिला प्रतिप्रश्न करते, “मग तू कोण आहेस?” यानंतर माही अरिश्फा खानला म्हणते, “तू आलीस? जरा चहाला उकळू दे.” त्यानंतर अरिश्फा किचनमध्ये जाऊन घरातील इतर सदस्यांकडे माहीची तक्रार करते. ती म्हणते, “ती मला ऑर्डर देत आहे.”
माही पुन्हा किचनमध्ये दिसते आणि अरिश्फाला म्हणते, “तू कपमध्ये दूध ओतून ठेव.” यावर अरिश्फा चिडते आणि म्हणते, “मला येत नाही, मी तुम्हाला सांगत तर आहे.” यानंतर ईशाही माहीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत म्हणते, “कालपासून जेव्हा ती आली आहे, तेव्हापासून म्हणतेय- तू माझ्यासाठी चहा बनव, तू माझे कपडे लाव. नशीब तिने अजून हे सांगितलं नाही की माझी अंतर्वस्त्रेही धू.” यावर अरिश्फा म्हणते, “मला तिच्याकडून थोडी विचित्र आणि नकारात्मक व्हाइब येत आहे.”
माहीच्या पहिल्याच दिवसाच्या वागण्यावर सोशल मीडिया युजर्सनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तिची तुलना तिचा पती जय भानुशालीच्या ‘बिग बॉस’मधील सहभागाशी केली. ‘माहीचा पहिला दिवस जयच्या संपूर्ण सिझनपेक्षा भारी’ अशा मजेशीर प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिल्या आहेत.
