अफेअर, ब्रेकअप, पॅचअप.. पर्सनल लाइफवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं रोखठोक उत्तर

अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अफेअर्सवरून तिला नेटकरी ट्रोलसुद्धा करतात. याच ट्रोलिंगवर आता मलायकाने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ट्रोलर्सची पर्वा करत नसल्याचं तिने म्हटलंय.

अफेअर, ब्रेकअप, पॅचअप.. पर्सनल लाइफवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं रोखठोक उत्तर
मलायका अरोरा, हर्ष, अर्जुन कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2025 | 12:44 PM

अभिनेत्री मलायका अरोराने नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. मलायका तिच्या फिटनेसमुळे आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सतत चर्चेत राहते. पण त्याचसोबत ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकांचं लक्ष वेधून घेते. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाचं नाव सतत कोणा ना कोणाशी जोडलं जातंय. यादरम्यान तिच्या एका डान्स व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. अरबाज खानसोबतचा घटस्फोट, मुलगा अरहानचं संगोपन, अर्जुनसोबतचं अफेअर-ब्रेकअप अशा विविध कारणांमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रीत करायला शिकले आहे. त्यामुळे नकारात्मकतेला मी माझ्यावर परिणाम करू देत नाही. ट्रोल्स तर नेहमी ट्रोल्सच राहणार. पण मी स्वत:ला त्या विषारीपणात सामील करू शकत नाही. माझ्यासाठी माझं कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि शांत मन अधिक महत्त्वाचं आहे.” यावेळी मलायका तिच्या करिअरबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. अभिनयातून नाही तर डान्स परफॉर्मन्समधून कामाचं अधिक समाधान मिळाल्याचं तिने सांगितलं.

“हे खरंय की अभिनयाने मला कधीच ते समाधान दिलं नाही, जे मला डान्स नंबर परफॉर्म करून मिळालं. मला अभिनय आवडायचं, खरंच मला खूप आवडायचं. पण डान्सवर माझं वेगळंच प्रेम आहे. मला माहितीये की आयटम नंबरचा लेबल खूपच मर्यादित वाटतो. पण आज मी अनेक कलाकारांना हे एक आव्हान म्हणून स्वीकारताना पाहते. आता परफॉर्म्न्स, संकल्पना आणि कथेत ते गाणं कसं फिट बसतं यावर अधिक लक्ष केंद्रीत केलं जातं. आधी त्याकडे फक्त व्हिज्युअल ट्रिट म्हणून पाहिलं जायचं. अशा गाण्यांना बनवायला जी मेहनत लागते, ते पाहून मला त्याचा अधिक आदर वाटू लागला आहे”, असं ती पुढे म्हणाली. ‘छैय्या छैय्या’, ‘माही वे’, ‘होठ रसिलें’, ‘मुन्नी बदनाम हुईं’, ‘अनारकली डिस्को चली’ यांसारखे तिचे आयटम साँग्स चांगलेच गाजले आहेत.