
बॉलिवूड इंडस्ट्रीतील खान कुटुंबात सध्या आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. दिवाळीच्या आधीच त्यांना ‘गुड न्यूज’ मिळाली आहे. दुसऱ्या लग्नाच्या जवळपास दीड वर्षांनंतर अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा पिता बनला आहे. पत्नी शुरा खानने नुकतंच मुलीला जन्म दिला. यादरम्यान अरबाजची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री मलायका अरोराची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2016 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. अरबाज आणि मलायका यांना अरहान हा 22 वर्षांचा मुलगा आहे.
मलायका आणि अरबाजने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या काही काळानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. जेव्हा अरबाजने डिसेंबर 2023 मध्ये शूरा खानशी दुसरं लग्न केलं, तेव्हा चाहत्यांनी अशी अपेक्षा होती की मलायका आणि अर्जुनसुद्धा लग्न करतील. परंतु त्या दोघांचं ब्रेकअप झालं. आता पूर्व पती अरबाज दुसऱ्यांदा पिता बनल्यानंतर मलायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती नवजोत सिंह सिद्धू यांच्या ‘सच्चे प्यार में कोई सौदेबाजी नहीं होती’ (खऱ्या प्रेमात कोणतीही सौदेबाजी होत नाही) या वक्तव्यावर जोर देताना दिसतेय.
मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या शोमधील एक क्लिप शेअर केली आहे. या शोमध्ये ती आणि नवजोत सिंह सिद्धू हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या व्हिडीओमध्ये नवजोत म्हणतात, “सच्चे प्यार में कोई सौदेबाजी नहीं होती.” हे ऐकून मलायका त्यावर जोर देऊन म्हणते, “पाजी मला हे लिहून घ्यायचं आहे. खऱ्या प्रेमात काय होत नाही?” तेव्हा नवजोत पुन्हा त्यांची ओळ म्हणतात, “सौदेबाजी नहीं होती.”
‘सिंघम 3’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुन कपूरने ‘सिंगल’ असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच्या आधीपासूनच दोघांच्या ब्रेकअपच्या खूप चर्चा होत्या. अर्जुन आणि मलायका यांच्या वयात बरंच अंतर असल्याने ही जोडी सुरुवातीपासूनच चर्चेत होती. ब्रेकअपनंतर अर्जुन आणि मलायका जेव्हा एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांच्यातील संकोचलेपणा स्पष्ट दिसत होता. मुंबईत नुकत्याच एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान दोघं अचानक एकमेकांसमोर आले होते. ‘होमबाऊंड’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला या दोघांनी हजेरी लावली होती. आजूबाजूला बरेच पापाराझी आणि फोटोग्राफर्स असल्याने मलायका आणि अर्जुनने एकमेकांची गळाभेट घेतली आणि बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर पुन्हा दोघांमधील संकोचलेपणा दिसू लागला होता.