
अभिनेता अरबाज खान वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा पिता बनला आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानने मुलीला जन्म दिला. 5 ऑक्टोबर रोजी अरबाज आणि शुरा यांच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन झालं. शुराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मधील घरी पोहोचली आहे. एकीकडे खान कुटुंबीयांनी तिचं आणि बाळाचं जोरदार स्वागत केलं. तर दुसरीकडे अरबाजच्या मुलीच्या जन्मानंतर त्याची पूर्व पत्नी मलायका अरोराने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
शुरा ही अरबाजची दुसरी पत्नी आहे. अरबाजने अभिनेत्री मलायका अरोराशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर 2023 मध्ये अरबाजने शुराशी निकाह केला. लग्नाच्या दोन वर्षांनंतर शुराने गुड न्यूज दिली आहे. अरबाज आणि शुराच्या मुलीच्या जन्माच्या चार दिवसांनंतर मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तीन रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिने बाकी काहीच लिहिलं नाही. त्यामुळे मलायकाने तिच्याच अंदाजात अरबाज आणि शुराला शुभेच्छा दिल्या की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
बुधवारी सकाळीसुद्धा मलायकाने एक पोस्ट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना नेहमी हसत राहण्याचा सल्ला दिला होता. ‘नेहमी हसण्यासाठी कारण शोधा’, असं त्यात लिहिलं आहे. याआधी मलायकाने खऱ्या प्रेमाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या शोमधील एक क्लिप शेअर केली होती. या शोमध्ये ती आणि नवजोत सिंह सिद्धू हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या व्हिडीओमध्ये नवजोत म्हणतात, “सच्चे प्यार में कोई सौदेबाजी नहीं होती.” हे ऐकून मलायका त्यावर जोर देऊन म्हणते, “पाजी मला हे लिहून घ्यायचं आहे. खऱ्या प्रेमात काय होत नाही?” तेव्हा नवजोत पुन्हा त्यांची ओळ म्हणतात, “सौदेबाजी नहीं होती.”
अरबाज आणि शुरा खानने सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. ‘सिपारा खान’ असं त्यांनी मुलीचं नाव ठेवलं आहे. या पोस्टवर नेटकरी आणि इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सिपाराची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.