अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चांवर मलायकाची पहिली प्रतिक्रिया; “शेवटपर्यंत प्रेमासाठी..”

जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यादरम्यान मलायका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेमाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चांवर मलायकाची पहिली प्रतिक्रिया; शेवटपर्यंत प्रेमासाठी..
Malaika Arora and Arjun Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 26, 2024 | 3:49 PM

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान अर्जुनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही ती गैरहजर राहिली. इतकंच नव्हे तर तिने त्याच्यासाठी वाढदिवसाची पोस्टसुद्धा लिहिली नाही. अर्जुन आणि मलायका हे त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मात्र अप्रत्यक्षपणे टोमणे मारताना दिसत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती प्रेमाविषयी व्यक्त झाली. अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चा असतानाही प्रेमावर अजूनही खूप विश्वास असल्याचं तिने म्हटलंय. “खऱ्या प्रेमाची कल्पना मी कधीच सोडणार नाही”, असं मलायका या मुलाखतीत म्हणाली.

‘हॅलो मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने सांगितलं, “काहीही झालं तरी खऱ्या प्रेमाच्या संकल्पनेवरील माझा विश्वास कधीच उडणार नाही. वृश्चिक रास असणारे असेच असतात. मीसुद्धा अगदी तशीच आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मी प्रेमासाठी लढेन. पण त्याचसोबत मी वास्तवाशी जोडून असते. मर्यादेची रेष कुठे ओढायची हे मला नीट ठाऊक आहे.” काही दिवसांपूर्वीच मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विश्वासाबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती. ‘मला अशी लोकं आवडतात ज्यांच्यावर मी डोळे बंद करून आणि त्यांच्याकडे पाठ करून विश्वास करू शकते’, अशा आशयाची ही पोस्ट होती.

या मुलाखतीत मलायका सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयीही व्यक्त झाली. “मी एक यंत्रणा किंवा ढाल तयार केली आहे. माझ्या आजूबाजूला कितीही नकारात्मकता असली तरी त्याचा माझ्यावर परिणाम होऊ देत नाही. मग हे लोकांबद्दल असो, कामाबद्दल असो किंवा सोशल मीडियाबद्दल असो.. ज्या क्षणी मला ती नकारात्मक ऊर्जा जाणवते, त्याक्षणी मी स्वत:ला त्यापासून दूर करते. सुरुवातीला मला अशा गोष्टींचा त्रास व्हायचा. मला रात्रीची झोप लागायची नाही. मीसुद्धा माणूस आहे आणि मलासुद्धा रडायला येऊ शकतं, मीसुद्धा खचू शकते. पण सार्वजनिक ठिकाणी तुम्ही त्या भावना माझ्या चेहऱ्यावर कधीच पाहणार नाहीत”, असं तिने स्पष्ट केलं.

19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.