22 कंपन्यांचा मालक, 2 घटस्फोट अन् 2 मुलींचा बाप; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं थाटलाय बिझनेसमॅनसोबत संसार; कोण आहे ती?
Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं 2 मुलींचा बाप असलेल्या बिझनेसमॅनसोबत लग्न केलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या.

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘मे आय कम इन मॅडम?’ आणि ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकांमुळे नेहाला विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र, तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या लग्नाचीही एकेकाळी जोरदार चर्चा झाली होती. नेहानं दोन घटस्फोट झालेल्या व्यावसायिकाशी लग्न केल्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तिचा पती शार्दुल सिंह ब्यास हा व्यावसायिक असून त्याच्या नावावर तब्बल २२ कंपन्या आहेत.
वयाच्या दहाव्या वर्षी सुरू केला अभिनयाचा प्रवास
नेहा पेंडसेनं अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. १९९५ मध्ये एकता कपूरच्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी ती अवघ्या दहा वर्षांची होती. त्यानंतर ‘हसरतें’ आणि ‘पडोसन’ यांसारख्या मालिकांमध्येही ती झळकली. १९९९ मध्ये ‘दाग : द फायर’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे तिनं मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. ‘भाग्यलक्ष्मी’, ‘दुसरी गोष्ट’, ‘प्रेमासाठी कमिंग सून’, ‘बाळकडू’, ‘नटसम्राट’ आणि ‘जून’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधूनही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
View this post on Instagram
नेहानं ५ जानेवारी २०२० रोजी पुण्यात व्यावसायिक शार्दुल सिंह ब्याससोबत मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. मात्र, या लग्नानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली. कारण शार्दुलचा यापूर्वी दोन वेळा घटस्फोट झाला होता. त्याच्या पहिल्या दोन लग्नांपासून त्याला दोन मुलीही आहेत. त्यामुळे नेहा ही त्याची तिसरी पत्नी आहे. या कारणामुळे नेहाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, तिनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. पतीच्या दोन घटस्फोटांवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना नेहानं स्पष्ट भूमिका मांडली होती. दोन लग्न अयशस्वी झाल्यानंतरही शार्दुलनं लग्नसंस्थेवरील विश्वास गमावला नाही, हीच त्याची सकारात्मक बाजू आहे,असं नेहा म्हणालेली.
पती शार्दुल ब्यास आहेत २२ कंपन्यांचे मालक
नेहाचा पती शार्दुल सिंह ब्यास हा पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक असल्याचं सांगितलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या नावावर तब्बल २२ कंपन्या आहेत. त्याच्या संपत्तीबाबतही अनेक दावे केले जातात. काही वृत्तांनुसार, त्याची एकूण संपत्ती १२५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १० हजार ५५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या संपत्तीच्या आकड्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
