Thane Politics: शिंदे गटाची दिवाळी पहाट, ठाकरे गट दुःखात; ठाण्यात कार्यक्रमावरुन राजकारण रंगलं!
दुष्काळग्रस्तांच्या परिस्थितीचं भान आणि शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या दुःखातून अद्याप पक्ष सावरलेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं बॅनरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.

Thane Politics: ठाण्यात दिवाळी पहाट निमित्त शिंदेंच्या शिवसेनेकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने यंदाही दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्तांच्या परिस्थितीचं भान आणि शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या दुःखातून अद्याप पक्ष सावरलेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं बॅनरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे गट अन् शिंदे गटात राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाण्यात शिंदे गटाची दिवाळी पहाट!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाण्यात उद्या दिवाळी पहाटनिमित्त मासुंदा तलाव परिसरात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम चर्चेचा विषय ठरणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून महिला आघाडीच्या वतीने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर युवा सेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांच्या पुढाकाराने गडकरी रंगायतन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे.
पुर्णेकरांच्या हत्येने ठाकरे गट दुःखात!
तर दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मागील वर्षी पूरग्रस्तांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द केला होता. यंदाही दुष्काळग्रस्तांची परिस्थिती आणि प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या दुःखातून पक्ष अद्याप सावरलेला नसल्याचं कारण देत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयाचा उल्लेख असलेला बॅनर सध्या ठाण्यात राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
एकीकडे शिंदे गटाकडून दिवाळी पहाट आणि शैक्षणिक मदतीचा कार्यक्रम, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून दुःखाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमांना राजकीय रंग चढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर ठाकरे गटाकडून प्रदीप पुणेकर हत्ती प्रकरणात राजकारण करू नये असा सल्ला व पदाधिकारी नितीन लांडगे यांनी दिला आहे. प्रदीप पुर्णेकर कुटुंबीयांना योग्य न्याय मिळेल यासाठी सरकार आणि पोलीस काम करत आहे.
