
डेस्टिनेशन वेडिंग, पैशाचा प्रचंड वापर अन् शाही लग्नसोहळे आजकाल केले जातात. लग्नांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. शाही लग्न करणं हे सध्या ‘स्टेटस’ बनलं आहे. मात्र खरंच इतका पैसा खर्च करून शाहीथाटात लग्न करण्याची गरज आहे का? असा प्रश्न ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गळगुंडे याने विचारला आहे. एका मुलाखतीदरम्यान तानाजीने लग्नव्यवस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. इतका खर्च करून मोठ- मोठी लग्न करण्यापेक्षा रजिस्टर लग्न करावं, असं तानाजी गळगुंडे याने म्हटलं आहे.
मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. कदाचित मी खूप पुढे गेलो असेन. पण मला आता लग्न पटत नाही. मला आता पटतंय ते फक्त लिव्ह अँड रिलेशनशीप… तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडता आहात. तर त्याच्यासोबत राहायला हवं, असं तानाजी म्हणाला.
लग्नाआधी एखाद्याला पाहायचं त्याला तुम्ही आवडता आहात की नाही ते माहिती नाही. तरीही त्या मुलीसोबत लग्न करायचं हे मला पटत नाही. सगळ्यांनी एकत्र यायचं… पण मग एका दिवसासाठी एवढा तामझाम कशासाठी… पाच- दहा लाख रुपये खर्च करायचे. एवढा खर्च करून वरात काढायची. नाचायची. एवढं कशासाठी करायचं, असं तानाजी म्हणाला.
आपल्याला जर आपल्या मित्रांसोबत नाचायचंच असेल. तर एखादी छोटी पार्टी करू आपण. त्या
पार्टीत नाचू आपण… माझा विचार वेगळा आहे की मला लिव्ह इन रिलेशनशीप जास्त ग्रेट वाटतं. पण जर लग्न कराचंच असेल तर ते रजिस्टर पद्धतीने करावं. फार खर्च नको. 2-4 हजारात लग्न केलं. तर ते मला चांगलं वाटतं, असं तानाजीने सांगितलं.
तानाजी गळगुंडे हा मराठीतील अभिनेता आहे. सुपरहिट ‘सैराट’ सिनेमात त्याने काम केलं आहे. ‘सैराट’ सिनेमात त्याने लंगड्या ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सैराटनंतरही त्याने विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. भिरकिट, फ्रि हिट दणका, एकदम कडक, गस्त, मुसंडी, माझा अगडबम, नवरदेव बीएससी अॅग्री, घर बंदुक बिरयाणी, झुंड, मनसु मिलयेंगे, या सिनेमांमध्ये तानाजीने काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचा वेगळा चाहता वर्ग आहे.