वडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या?

कोणतीही कला साधनेशिवाय येत नसते. साधनेनंतरच ती कला बहरते आणि फुलतेही. (know how vaishali shinde become singer?)

वडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या?
गायिका वैशाली शिंदे


मुंबई: कोणतीही कला साधनेशिवाय येत नसते. साधनेनंतरच ती कला बहरते आणि फुलतेही. त्यात जर गायन हा कला प्रकार असेल तर त्यासाठी रोज रियाज करणं आलंच. पण काही लोकांना गायनाची उपजत देणगी मिळालेली असती. कोणत्याही शिकवणी शिवाय हे कलाकार नावारुपाला आलेले असतात. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. आंबेडकरी चळवळीतील गायिका वैशाली शिंदे या त्यापैकीच एक आहेत. (know how vaishali shinde become singer?)

वडील कडिया कामगार, पण घरात गाणं

वैशाली शिंदे यांचा जन्म 4 एप्रिल 1962 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अतिदुर्गम गावात झाला. त्यांचे वडील रामचंद्र क्षीरसागर आणि आई सरुबाई क्षीरसागर दोघेही मोलमजूरी करायचे. रामचंद्र क्षीरसागर हे कडिया कामगार होते. वैशाली शिंदे यांचं नाव दया होतं. मात्र, प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्या दया क्षीरसागरच्या वैशाली शिंदे झाल्या.

इथून सुरूवात झाली

वैशाली यांच्या आई-वडिलांचा आवाज मधूर होता. ते घरात बुद्ध-भीम गीते गायचे. वडील ढोलकीही वाजवायचे. त्यामुळे वैशाली यांचा कान लहानपणापासूनच तयार झाला होता. कालांतराने क्षीरसागर कुटुंब कामाच्या शोधात पुण्यात चिंचवड गावात आलं. त्यानंतर काही वर्षाने क्षीरसागर कुटुंब पिंपरीत स्थायिक झालं. त्यांच्या शेजारी मच्छिंद्र कांबळे मामा राहायचे. कांबळेंची गायन पार्टी होती. त्यांच्या घरात गाण्याची मैफल रंगायची. तेव्हा वैशाली या छोटी बहीण कल्याणीला घेऊन कार्यक्रम ऐकायच्या. कधी कधी कांबळे मामांच्या गायन पार्टीत गायच्याही. त्यावेळी पैसे मिळायचे नाहीत. त्या केवळ हौसेखातर गायच्या.

मुंबईत आल्या आणि…

वैशालीताई पुण्याहून मुंबईत आल्या तेव्हा त्यांची पहिली भेट कवी लक्ष्मण राजगुरु यांच्याशी झाली. लक्ष्मण राजगुरु अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी वैशालीताईंना गाण्यातील बारकावेही शिकवले. त्यामुळे गायिका म्हणून त्या तयार झाल्या. राजगुरु यांनी गायिका म्हणून तयार केल्याने त्यांनी गुरु मानले. राजगुरु त्यांना प्रत्येक कार्यक्रमात नेत, समाजाची गायिका म्हणून त्यांची ओळख करून देत. वैशालीताईंचा आवाज, त्यांची गाणी लोकांनी ऐकावी असं त्यांना वाटायचं. त्यासाठीच राजगुरुंचा हा खटाटोप असायचा. मात्र, असं असलं तरी आपला आवाज हा नैसर्गिक आहे. कुणीही आपल्याला ताल, सूर शिकवला नाही, असं त्या सांगतात.

वैशालीताईंची गाणी

देशावासियों जागते रहो,
बाबा भीमजीके संविधान को पहचानलो,
बोलो जयभीम बोलो…

आणि

घर कौलारू दुरून दिसतं,
बघणाऱ्यांच्या मनात ठसतं,
अंगणात पिंपळाचं झाडं,
माझं माहेर नदीच्या पल्याड… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know how vaishali shinde become singer?)

संबंधित बातम्या:

गाजलेल्या ‘नाजुका’ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात?

शाळेत असतानाच आडनाव टाकलं, चार हजारांवर गाणी गायली; ‘या’ गायिकेबद्दल माहीत आहे का?

‘पुण्याचा राघू’ने ओळख मिळाली, आनंद-मिलिंद शिंदेंचा प्रभाव; वाचा, गायक राहुल शिंदे यांचे किस्से

(know how vaishali shinde become singer?)