40 किलो सोनं, एक थिएटर, 4 पात्रं; कुठलंही प्रमोशन नाही, तरी ‘तुंबाड’ फेम दिग्दर्शकाचा नवा चित्रपट ‘मयसभा’ चर्चेत

'तुंबाड' फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा 'मयसभा' हा चित्रपट कोणत्याही खास बजेट, कोणत्याही खास प्रमोशनशिवाय आणि अत्यंत मोजक्या स्क्रीन्ससह थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. जावेद जाफरीच्या करिअरमधील हा सर्वांत बेस्ट परफॉर्मन्स मानला जातोय.

40 किलो सोनं, एक थिएटर, 4 पात्रं; कुठलंही प्रमोशन नाही, तरी तुंबाड फेम दिग्दर्शकाचा नवा चित्रपट मयसभा चर्चेत
राही अनिल बर्वे, जावेद जाफरी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2026 | 2:54 PM

राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ या चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आणि अद्भुत होती. विशेष बजेट नसताना, कोणत्याही प्रमोशनशिवाय या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट एक सरप्राइज हिट ठरला होता. आता राही अनिल बर्वे यांचाच दुसरा चित्रपट ‘मयसभा’ चर्चेत आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी मुख्य भूमिकेत आहे. ‘मयसभा’ चित्रपट ‘तुंबाड’सारखा नाही, आणि तो तुम्ही आजवर पाहिलेल्या इतर कोणत्याही चित्रपटासारखाही नाही.

‘मयसभा’ चित्रपटात प्रेक्षक आणि चार व्यक्तिरेखा एकत्र मिळून प्रवास सुरू करतात. दोघांसाठी खजिन्याचा शोध एकाच क्षणी सुरू होतो. पण चित्रपट जसजसा पुढे जातो, तसा या पात्रांना येणारा अनुभव आणि प्रेक्षकांना येणारा अनुभव यामध्ये फरक पडू लागतो. यामध्ये पात्रांना जो धक्का बसतो, तो त्यांना कथानकात जे सापडतं, त्यामधून आलेला असतो, तर प्रेक्षक मात्र सत्य जाणून अवाक् होतात, अशी सत्ये जी या पात्रांना दिसत नाहीत. या चित्रपटाचा सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट क्लायमॅक्समध्येच आहे. क्लायमॅक्ससाठी बर्वे यांनी पारंपरिक थरारपटांशी संबंधित अशा जवळपास सर्वच नियमांना फाटा देत संपूर्ण वेगळा मार्ग निवडला आहे.

या चित्रपटात जावेद जाफरी कधीही न पाहिलेल्या, पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहेत. ‘हा जावेद जाफरीचा आजवरचा सर्वात वेगळा आणि गंभीर रोल असणार,’ अशी भावना टीझर-ट्रेलर पाहिल्यानंतर व्यक्त करण्यात आली. या चित्रपटात वीणा जमकर, दीपक दामले आणि मोहम्मद समद यांच्यासारख्या दमदार कलाकारांची फौज आहे.

मयसभाची कथा

‘मयसभा’च्या ट्रेलरवरून हे स्पष्ट होतंय की हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. एक चित्रपट निर्माता (जावेद जाफरी) एका थिएटरमध्ये 40 किलो सोनं लपवतो. परंतु हे सोनं त्याने कुठे लपवलंय हेच तो विसरतो. जवळपास 20 वर्षांपासून तो या जीर्ण झालेल्या ‘मयसभा’ थिएटरमध्ये राहतोय. अचानक एकेदिवशी त्याचा मुलगा त्याच्या दोन मित्रांसोबत सोनं शोधण्याच्या उद्देशाने थिएटरमध्ये येतो. ‘मयसभा’मधील या चार लोकांमध्ये 24 तासांच्या कालावधीत जे काही घडतं, त्याची कथा या चित्रपटात पहायला मिळते.