पुण्याच्या सई – शरयू ठरल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या महाविजेत्या

| Updated on: Jun 05, 2023 | 8:40 AM

सई आणि शरयू या दोघीही पुण्यातल्या गौरव डान्स अकादमीमधून नृत्याचं शिक्षण घेत आहेत. याच दरम्यान त्यांना मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली.

पुण्याच्या सई - शरयू ठरल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या महाविजेत्या
Sai and Sharayu
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पिंपरी पुणे इथल्या सई आणि शरयू यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर जळगावचे सागर आणि दिव्येश उपविजेते ठरले. तृतीय क्रमांकाचा मान कल्याणच्या झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला. तर श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं.

महाअंतिम सोहळ्यातील विजेत्या सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या खास सोहळ्यात सई आणि शरयूला शुभविवाह मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती. विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना सई आणि शरयू म्हणाल्या, “हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल आम्ही आभारी आहोत. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.”

हे सुद्धा वाचा

सई आणि शरयू या दोघीही पुण्यातल्या गौरव डान्स अकादमीमधून नृत्याचं शिक्षण घेत आहेत. याच दरम्यान त्यांना मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेता हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. नृत्याची आवड आणि दोघींमधल्या घट्ट मैत्रीने सई आणि शरयूला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं. सई आणि शरयू जरी या पर्वाच्या विजेत्या असल्या तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे.