‘धुरंधर 2’ला टक्कर देण्यासाठी ‘मेरी ल्यारी’चा ट्रेलर रिलीज; स्पाय थ्रिलरपेक्षा किती वेगळी कथा?

बॉलिवूडच्या 'धुरंधर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने 'मेरी ल्यारी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. कराचीमधल्या ल्यारी टाऊनवर आधारित या चित्रपटाची नेमकी कथा काय आहे, ते जाणून घ्या..

धुरंधर 2ला टक्कर देण्यासाठी मेरी ल्यारीचा ट्रेलर रिलीज; स्पाय थ्रिलरपेक्षा किती वेगळी कथा?
Meri Lyari and Dhurandhar 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 27, 2026 | 9:51 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांवर आधी पाकिस्तानमध्ये बंदी आणली होती. पाकिस्तानच्या कराचीमधील ल्यारी परिसरातील गँग-वॉरवर आधारित हे चित्रपट होते. त्याला पाकिस्तानमध्ये प्रचंड विरोध झाला होता. त्यानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे. बंदी उठवल्यानंतर पाकिस्तानने ‘मेरी ल्यारी’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आणि नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित केला. हा चित्रपट ‘धुरंधर’ला टक्कर देण्यासाठी बनवल्याचं म्हटलं जात आहे. परंतु ‘मेरी ल्यारी’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, जो एका माजी प्रशिक्षकाची कथा सांगतो.

‘मेरी ल्यारी’ या चित्रपटाची कथा फुटबॉलमध्ये करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दोन महिलांवर आधारित आहे. त्याचप्रमाणे ल्यारी शहर गेल्या काही वर्षांत कसं बदललं आहे आणि आता ते फक्त हिंसाचार किंवा गँगवॉरसाठी ओळखलं जात नाही, हे याच अधोरेखित करण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा ओमरने एका प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे, जी कौटुंबिक हिंसाचार आणि गंभीर दुखापतीनंतर, तिथल्या मुलींना फुटबॉल शिकवण्यासाठी आपल्याच भागात परत येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्यासाठी ‘मेरी ल्यारी’चा प्रीमिअर युके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता.

पहा ट्रेलर-

सिंधचे माहिती मंत्री शरजील मेमन या चित्रपटाविषयी म्हणाले, “हा चित्रपट ल्यारीचं सत्य दाखवतो. पाकिस्तानचं नकारात्मक चित्रण करणाऱ्या एका भारतीय चित्रपटाला हे प्रत्युत्तर आहे.” मेमन यांनी नाव न घेता ‘धुरंधर’ला हा टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे.

‘मेरी ल्यारी’ या चित्रपटात आयेशा ओमर, दानानीर मोबीन आणि ट्रिनेट लुकास यांच्या मुख्य भूमिका आहेत. अबू अलीहा दिग्दर्शित हा चित्रपट 8 मे रोजी पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तर दुसरीकडे आदित्य धरचा ‘धुरंधर’ हा चित्रपट एक स्पाय थ्रिलर होता. यामध्ये अभिनेता रणवीर सिंहने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती, जो 2000 च्या दशकात ल्यारीमधील रहमान बलोचच्या टोळीत घुसतो. हा परिसर तस्करी, दहशतवादाचं केंद्र कसं बनलं, हे त्यात दाखवण्यात आलं आहे.

Follow Us