ना मला मारायचं, ना माझ्यावर..; ‘जेलर 2’साठी मिथुन चक्रवर्ती यांनी रजनीकांत यांच्यासमोर ठेवली मोठी अट
Jailer 2: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी 'जेलर 2' या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासमोर मोठी अट ठेवली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीचा खुलासा केला आहे,

Jailer 2: साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘जेलर 2’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटासाठी होकार देण्यापूर्वी मिथुन यांनी रजनीकांत यांच्यासमोर एक मजेशीर अट ठेवली होती. खुद्द रजनीकांत यांनी ‘जेलर 2’च्या विशेष कार्यक्रमात हा किस्सा सांगितला. त्यानंतर दोन्ही दिग्गज कलाकारांच्या मैत्रीची आणि त्यांच्या विनोदी स्वभावाची चर्चा रंगली आहे.
‘मला मारणार असाल तर..’
‘जेलर 2’मध्ये मिथुन चक्रवर्ती खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. मात्र, सुरुवातीला या भूमिकेसाठी निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला नव्हता. रजनीकांत यांच्यासारख्या सुपरस्टारच्या विरोधात खलनायक म्हणून काम करताना आपल्या व्यक्तिरेखेला मार खावा लागेल का, असा प्रश्न मिथुन यांनी विचारला होता. रजनीकांत यांनी सांगितलं की, मिथुन हे त्यांचे चांगले मित्र आहेत. निर्मिती टीमने त्यांना चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा त्यांनी मिश्किलपणे विचारलं की, ‘मी खलनायकाची भूमिका करणार आणि रजनीकांत यांच्याकडून मार खाणार? मग मी हा चित्रपट का करू?’ त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सुरुवातीपासूनच या कास्टिंगमागे एक मजेशीर किस्सा तयार झाला होता.
रजनीकांत यांच्यासमोर ठेवली खास अट
यानंतर एका कार्यक्रमात रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट झाली. यावेळी ‘जेलर 2’मधील भूमिकेबद्दल पुन्हा चर्चा झाली. मिथुन यांनी रजनीकांत यांना सांगितलं की, तुम्ही म्हणत असाल तर मी चित्रपटात काम करायला तयार आहे. मात्र, त्यासाठी एक अट मान्य करावी लागेल. मिथुन यांची अट होती की, “तुम्ही मला मारायचं नाही आणि माझ्यावर गोळीही झाडायची नाही!” त्यांच्या या मागणीवर रजनीकांत यांनी दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्याशी बोलून निर्णय कळवतो, असं सांगितलं. मिथुन केवळ गंमत करत असावेत, असं आपल्याला वाटलं होतं, असंही रजनीकांत यांनी या कार्यक्रमात नमूद केलं.
जवळपास तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र
रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती यांना यापूर्वी 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता अनेक वर्षांनी हे दोघं पुन्हा एकदा एकाच चित्रपटात दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ‘जेलर 2’चं दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केलं आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्याच्या सीक्वेलकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.
‘जेलर 2’मध्ये कलाकारांची मोठी फौज
या चित्रपटात रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत मोहनलाल, विद्या बालन, एस. जे. सूर्या आणि रम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवराजकुमार आणि जॅकी श्रॉफ विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अॅक्शन, विनोद आणि दमदार कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
