Dashavatar : दशावतार पाहताच राज ठाकरे भारावले, म्हणाले गेल्या कित्येक वर्षांपासून…

सध्या दशावतार या मराठी चित्रपटाची राज्यभर चर्चा होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा चित्रपट पाहिला असून त्याविषयी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपट पाहावे, असे आवाहन केले आहे.

Dashavatar : दशावतार पाहताच राज ठाकरे भारावले, म्हणाले गेल्या कित्येक वर्षांपासून...
raj thackeray
| Updated on: Sep 15, 2025 | 9:08 PM

Raj Thackeray On Dashavatar Film : सध्या दशवातार या मराठी चित्रपटाची राज्यभर चर्चा होत आहे. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. दशावतार या चित्रपटातून हाताळण्यात आलेल्या मुद्द्याचीही सध्या चर्चा आहे. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील हा चित्रपट पाहिला असून त्यांनी चित्रपटाविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकानेच पाहावा असा हा चित्रपट असून प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी एका मुद्द्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी या चित्रपटात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

गेली अनेक वर्ष मी…

दशावतार या चित्रपटात गंभीर विषयाला हात घालण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष मी महाराष्ट्राला हीच गोष्ट सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. कारण जमिनी हे तुमचं अस्तित्व आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हा प्रकार फक्त एकट्या कोकणामध्ये होतो असा भाग नाही. हा विषय अत्यंत चालाखीने चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे, असे कौतुक राज ठाकरे यांनी केले. तसेच दशावताराच्या सर्व रूपांमधून महाराष्ट्रातील ही समस्या समोर आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

दिलीप प्रभावळकर यांच्याविषयी नेमकं काय म्हणाले?

मी चित्रपटाची कथा सांगत नाही. पण या चित्रपटाचे छायाचित्रण, संगीत अत्यंत उत्कृष्ट आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक सुबोध आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांनी उत्तम काम केले आहे, हे अत्यंत छोटे वाक्य आहे. कारण दिलीप प्रभावळकर खूप मोठे आहेत. त्यांनी कमाल केली आहे, असेही राज ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले. या चित्रपटातील इतरही कलाकारांनी उत्तम काम केले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनीसुद्धा उत्तम काम केले आहे. प्रियदर्शनी यांनी सुद्धा उत्तम काम केले, असेही राज ठाकरे सांगायला विसरले नाहीत.

प्रत्येकाने चित्रपट पाहण्याचे आवाहन

या चित्रपटात मनोरंजन नक्कीच आहे. पण फक्त मनोरंजन म्हणून हा चित्रपट नाही पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे. त्यामुळेच हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान दशावतार हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.