REVIEW : कसा आहे ‘भारत’?

Namrata Patil

|

Updated on: Jun 06, 2019 | 10:34 PM

'जितने सफेद बाल मेरे सर और दाढीमें हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है, या संवादावरुनच तुम्ही अंदाज लावू शकता भाईजानच्या या सिनेमात मसाला ठासून भरलेला आहे.

REVIEW : कसा आहे 'भारत'?
Follow us

ईद आणि सलमान खान हे जणू समीकरणचं. यंदाही भाईजानने त्याच्या चाहत्यांना ईदची ‘भारत’च्या रुपानं खास भेट दिलीये. हा सिनेमा दबंग खानच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. सलमाननं या सिनेमात वेगळा प्रयोग  केला असून पाच वेगवेगळ्या लूक्समध्ये तो या सिनेमात दिसला आहे. या सिनेमात भारतच्या तारुण्यावस्थेपासून  वृद्धावस्थेपर्यंतचा काळ रंगवण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकचं सलमानची वेगवेगळी रुपं दिसणं अपेक्षित होतं. सलमाननं ही आपल्या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेतली आहे. कोरिअन फिल्म ‘ओड टु माय फादर’ चा ‘भारत’  ऑफिशियल रिमेक असून मूळ सिनेमापेक्षा बरेच बदल या सिनेमात करण्यात आलेत.

दिग्दर्शक अली अब्बास जाफर आणि सलमान खानच्या जोडीनं आतापर्यंत ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’  हे दोन सुपरहिट सिनेमे  दिले आहेत. त्यामुळे ‘भारत’कडूनही नक्कीच अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढीमें हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है, या संवादावरुनच तुम्ही अंदाज लावू शकता भाईजानच्या या सिनेमात मसाला ठासून भरलेला आहे.

‘जर्नी ऑफ अ मॅन अॅण्ड अ नेशन टुगेदर’

सिनेमाची वन लाईन ‘जर्नी ऑफ अ मॅन अॅण्ड अ नेशन टुगेदर’ ही खऱंच इंटरेस्टिंग आहे. अली अब्बास जाफऱ आणि सलमानच्या जोडीने ही लाईन घेऊन बघितलेलं स्वप्न पडद्यावर त्याच आत्मविश्वासानं साकारलं आहे. भूमिका कुठलीही असो पण सलमान सिनेमात सलमानचं वाटतो, मात्र आता ‘भारत’ बघितल्यानंतर सलमानला जर योग्य पध्दतीनं हाताळलं तर तो उत्तम अभिनय करु शकतो हे सिध्द झालं आहे.

भारताची फाळणी आणि वडिल-बहिणीचा दुरावा

चित्रपटाची कथा फ्लॅशबॅकमध्ये १९४७ साली सुरु होते. फ्लॅशबॅकमध्ये भारताची होणारी फाळणी, त्या काळातील जनतेची परिस्थिती, या सगळ्यात भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याचा जीवनाशी सुरु असलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. फाळणीच्या वेळेस भारत(सलमान खान) आपले स्टेशन मास्तर वडील (जॅकी श्रॉफ) आणि बहिणीपासून दुरावतो. दुरावतांना तो आपल्या वडिलांना वचन देतो की जर ते परत आले नाहीत तर तो आयुष्यभर त्याची आई (सोनाली कुलकर्णी) आणि लहान भावाची काळजी घेईल. भारत आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीत स्थायिक होतो. यावेळी त्याला विलायती(सुनिल ग्रोवर)ची मोलाची साथ मिळते. आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून भारत रात्री सर्कसमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करतो. त्याच्यासोबत सर्कसमध्ये काम करणाऱ्या राधा(दिशा पटानी)वर त्याचा जीव जडतो. पण त्यांची ही प्रेमकहाणी फार काळ पुढे सरकत नाही. कारण जास्त पैसे कमावण्याच्या उद्देशानं भारत १९६४ साली आखाती देशात तेल काढणाऱ्या कंपनीत कामगार म्हणून रूजू होतो.

भारतचा खडतर प्रवास

त्या ठिकाणी त्याची ओळख कुमुद(कतरिना कैफ)शी होते. भारतचा कुमुदवर जीव जडतो. भारत ‘स्लो मोशन’मध्ये इंम्प्रेस करण्याचा प्रयत्न करु लागतो. 1947 ते 2010 पर्यंतचा भारतचा खडतर प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सगळ्या काळात आपल्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासू नये म्हणून चोरी, स्टंट, किराणा दुकान, आखाती देशात जाऊन तेल काढण्याचं काम अशी अनेक धोकादायक काम तो करतो. यातून त्याचं आपल्या कुटुंबाबद्दलचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. आता भारत वडील परत आपल्या कुटुंबाला भेटतात का ? भारत आपल्या कुटुंबासाठी काय बलिदान देतो? भारत आणि कुमुदचं लग्न होतं का? राधा परत भारतच्या आयुष्यात येते का? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘भारत’ बघावा लागेल.

क्लायमॅक्स अफलातून

सिनेमाची कथा इंटरेस्टींग आहे. दिग्दर्शक अली अब्बास जाफरनंही ती उत्तम फुलवली आहे. सिनेमात फॅमिली व्हॅल्यू दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. चित्रपटाच्या कथेत फाळणीच्या वेळेस भारत-पाकिस्तान दुरावलेल्या लोकांना एकत्र आणणं, शहरीकरण, स्मार्ट सिटीच्या नावाखाली दुकानं तोडून मॉल बनवण्याचा ट्रॅकही आहे. अलीनं मोठ्या हुशारीनं सिनेमात सलमानचा वापर केला आहे. भाईच्या कौटुंबिक आणि हिरोईक इमेजला हात लावण्याचा कुठलाही प्रयत्न अलीनं केलेला नाही. या चित्रपटात रोमान्स, सस्पेन्स, अक्शन, इमोशनचा योग्य ताळमेळ दिग्दर्शकानं सिनेमात बसवला आहे. सिनेमाची लांबी कमी करता आली असती, तर कदाचित ‘भारत’  अजून उत्तम चित्रपट झाला असता. कदाचित 1947 ते 2010 पर्यंतचा एका व्यक्तीचा प्रवास सिनेमात दाखवायचा असल्यामुळे दिग्दर्शकाला हे शक्य झालं नसेल. छोट्या छोट्या गोष्टींवर चांगलीच मेहनत घेण्यात आलीये. चित्रपटाचा क्लायमॅक्स अफलातून आहे.

भारत…भारत…!

‘भारत’चं वर्णन थोडक्यात करायचं झालं तर सुरुवातीचे 35मिनिट आणि शेवटची 15 मिनिटं भन्नाट. मध्यंतरानंतर चित्रपटाच्या गतीला ब्रेक लागतो. पण शेवटच्या 15 मिनिटात या सिनेमानं परत चांगली पकड मिळवली आहे. चित्रपटाचं एडिटींग अजून शार्प असतं तर बरं झालं असतं. चित्रपटगृहात भारत…भारत..! चा जयघोष कानावर पडताच प्रत्येक भारतीय नागरिकाची छाती अभिमानाने फुलेल. आखाती देशात भारतीयांसह, पाकिस्तानी, श्रीलंका आणि इतर देशांचे नागरिकही जर ‘भारत.. भारत’ असा जयघोष करत असतील तर हा अभिमान शब्दात व्यक्त होणं कठीण. सिनेमातील हे दृश्य नक्कीच तुमच्या काळजाचा ठाव घेईल.

प्रत्येक पात्र ‘या’ सिनेमाचा नायक

मार्सिन लास्काविसची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. विशाल-शेखऱचं संगीत आधीच हिट झालंय. विशेषत: ‘स्लो मोशन’ आणि ‘चश्नी’ ही गाणी भन्नाट झाली आहेत. ‘भारत’ हा फक्त सलमान खानचा सिनेमा नसून सिनेमातील प्रत्येक पात्र या सिनेमाचा नायक आहे. सलमाननं या सिनेमात अफलातून बॅटिंग केलीये. 20 वर्षाच्या युवकापासून ते 70 वर्षाच्या वृध्दापर्यंत त्याने आपली भूमिका चोख बजावली आहे. आता 70 वर्षाच्या वृध्दाच्या भूमिकेतील भाईची रफ एन्ड टफ बॉडी लॅंग्वेज खटकते. पण पडद्यावर सलमान नावाच्या ‘वलया’समोर नक्कीच फॅन याकडे कानाडोळा करतील. सलमाननं इमोशन, कॉमेडी आणि अक्शन सगळ्याच गोष्टीत बाजी मारली आहे.

कतरिना सरप्राईज पॅकेज

सलमानचे अगोदरचे काही सिनेमे बघता ‘भारत’ चांगला वाटतो. सिनेमात सरप्राईज पॅकेज ठरली आहे कतरिना कैफ. कुमुदच्या भूमिकेत कतरिनाने चार चांद लावले आहेत. कतरिना पडद्यावर सुंदर तर दिसलीच आहे पण आपल्याला अभिनयही करता येतो हे कतरिनानं या सिनेमात दाखवून दिलं आहे. कॉमिक टायमिंग असो वा इमोशनल सीन्स सगळ्यामध्येच कतरिनाने बाजी मारली आहे. भारतचा मित्र विलायतीच्या भूमिकेत सुनिलनं कमाल केली आहे. कॉमेडीसोबतचं आपण  इमोशनल सीन्सही उत्तम करु शकतो हे सुनिलनं दाखवून दिलं. सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी, कुमुद मिश्रा, तब्बू, शशांक अरोडा यांनीही आपल्या भूमिका छोटया असल्या तरी चोख चोख निभावल्या आहेत.

एकूणच काय तर चटपटीत संवाद, गाणी, डान्स, अ‍ॅक्शन असा मसाला असला की दबंग खान फुल टू फॉर्मात बटिंग करतो हे ‘भारत’मुळे सिध्द झालं आहे. भाईजाननं ईदच्या मुहुर्तावर त्याच्या चाहत्यांना दिलेली ही भेट त्यांना नक्कीच  आवडेल. सिनेमात काही त्रुटी असल्या तरी सिनेमात मसाला ठासून भरलेला असल्यामुळे ‘भारत’ तुम्हाला निराश करणार नाही.

‘टीव्ही 9 मराठी’कडून ‘भारत’ला मी देतोय तीन स्टार्स. 

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI