मुंबई फिल्म सिटीमध्ये भीषण आग, बादशाह, एमएस धोनीसह सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं, नेमकं काय घडलं?
मुंबई फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागल्याची मोठी बातमी समोर आली आहे. ही आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत अनेक साहित्यांचं नुकसान झालं असून नेमकं आग कशी लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.

मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके फिल्म सिटीमधून मोठी बातमी समोर आली आहे. फिल्म सिटी परिसरातील प्राइम फोकस स्टुडिओच्या एका भागात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ज्या वेळी ही आग लागली, त्यावेळी परिसरातील अनेक सेटवर मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची शूटिंग सुरू होती.
आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि आकाशात पसरलेला काळा धूर दिसताच फिल्म सिटीमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या सेटवरील कलाकार, क्रू मेंबर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
‘एमटीव्ही हसल’च्या ग्रँड फिनालेची शूटिंग सुरू होती
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या अगदी जवळ ‘एमटीव्ही हसल’च्या ग्रँड फिनालेची शूटिंग सुरू होती. या शूटसाठी रॅपर बादशाह सेटवर पोहोचले होते. त्यांच्यासोबत रफ्तार, इक्का, डिनो जेम्स, डी एमसी, ईपीआर आणि रागा यांच्यासह शोचे स्क्वॉड बॉसेस, ज्यूरी आणि फायनलिस्ट्सही उपस्थित होते.
आग लागल्याची माहिती मिळताच शूटिंग थांबवण्यात आली आणि सेटवरील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कलाकार आणि क्रू मेंबर्समध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं.
एमएस धोनीही जवळच करत होते शूटिंग
विशेष म्हणजे ‘एमटीव्ही हसल’च्या सेटच्या शेजारीच ‘पती पत्नी और पंगा’ या शोचा सेट असल्याची माहिती आहे. याशिवाय काही अंतरावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी उपस्थित असल्याचंही सांगितलं जात आहे.
आगीचा धूर आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन आसपासच्या सर्व सेटवरील शूटिंग तातडीने थांबवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात खबरदारी घेण्यात आली.
अग्निशमन दलाच्या 4-5 गाड्या घटनास्थळी
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सुमारे 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचं काम सुरू केलं. स्टुडिओतील सुरक्षारक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली.
दरम्यान, आगीमुळे सेट आणि शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या महागड्या उपकरणांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा तपास केला जाणार आहे.