मुमताजचं सुपरहिट गाणं, ज्यामधील तिची साडी ठरलेली फॅशन आयकॉन, आजही अनेक मुली करतात कॉपी
मुमताज यांच्या ‘नारंगी साडी’ने बदलला फॅशनचा ट्रेंड; एका गाण्यासाठी तयार केलेला लूक पुढे ठरला ‘मुमताज साडी’ची ओळख. आजही अनेक महिला फॉलो करतात हा लूक.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांमधील एखाद्या कलाकाराची स्टाईल ही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. अनेकजणांनी तर त्यांच्या स्टाईल कॉपी देखील केल्या. अशीच एका अभिनेत्रीच्या साडीची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ हे गाणं आजही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आयकॉनिक डान्स नंबर्सपैकी एक मानलं जातं. या गाण्यात अभिनेत्री मुमताज यांच्या डान्ससोबतच त्यांच्या खास नारंगी रंगाच्या साडीनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, डान्स करताना सहज हालचाल करता यावी यासाठी खास पद्धतीने तयार करण्यात आलेली ही साडी प्रचंड लोकप्रिय ठरली.
मुमताज साडी म्हणून प्रसिद्ध
या खास साडीची रचना प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांनी केली होती. साडीला आधीच प्लीट्स तयार करून देण्यात आल्या होत्या, तर एका बाजूला झिप लावण्यात आली होती. त्यामुळे डान्स करताना साडी सांभाळण्याची अडचण येत नव्हती. खालच्या बाजूचा फ्लेअर असल्याने या साडीला स्कर्टसारखा लूक मिळत होता. गोल्ड गोटा बॉर्डर आणि फ्रिल असलेली हेमलाइन यामुळे अभिनेत्रीच्या साडीचा लूक आणखी आकर्षक झाला होता.
मुमताज यांनी नंतर सांगितल्याप्रमाणे, त्यांना साडीमध्ये डान्स करण्याबाबत फारसा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे भानू अथैया यांनी त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा येऊ नये आणि त्याचवेळी लूकही ग्लॅमरस दिसावा, यासाठी या वेगळ्या पद्धतीच्या साडीची निर्मिती केली. मात्र, एका डान्स नंबरसाठी केलेला हा प्रयोग पुढे ‘मुमताज साडी’ म्हणूनच प्रसिद्ध झाला.
सहा दशकांनंतरही त्याच साडीची चर्चा
आजही या साडीची चर्चा केली की मुमताज यांचा तो नारंगी रंगाचा लूक डोळ्यासमोर उभा राहतो. पुढील अनेक दशकांमध्ये या स्टाईलची नक्कल करण्यात आली. प्री-स्टिच्ड आणि कॉन्सेप्ट साड्यांच्या लोकप्रियतेमागेही अशा प्रयोगांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
मात्र, जवळपास सहा दशकांनंतर ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ या गाण्याची सर्वाधिक आठवण होते ती मुमताज यांच्या त्या अनोख्या नारंगी साडीमुळेच. डान्समध्ये सहजता यावी म्हणून तयार करण्यात आलेला हा पोशाख पुढे भारतीय चित्रपट फॅशनमधील एक आयकॉनिक स्टाईल स्टेटमेंट ठरला.