AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाने अभिनेता पाहिला; काहींनी मात्र ‘माणूस’ अनुभवला… नाना पाटेकर कायम का लक्षात राहतील? वाचा आठवणींची हळवी गोष्ट!

Nana Patekar News: नाना पाटेकर गेले आहेत. पण माणुसकीचा असा वारसा मागे ठेवून गेले जो कधीच संपणार नाही. त्यांनी दिलेली माणुसकीची शिकवण पिढ्यान्‌पिढ्या जिवंत राहील.

जगाने अभिनेता पाहिला; काहींनी मात्र 'माणूस' अनुभवला... नाना पाटेकर कायम का लक्षात राहतील? वाचा आठवणींची हळवी गोष्ट!
| Updated on: Oct 10, 2026 | 10:33 PM
Share

काही कलाकार पडद्यावर येतात आणि भूमिका संपली की प्रेक्षकांच्या आठवणीत विरून जातात. पण काही कलाकार असे असतात, ज्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या आवाजाचा ठसा मनात घुमत राहतो. नाना पाटेकर हे त्यापैकीच एक. मराठी रंगभूमीपासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात निधन झालं.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं; डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे CPR देऊनही त्यांना वाचवता आलं नाही. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अंत्यसंस्काराचा निर्णय पूर्ण शासकीय इतमामात घेण्यात आला. पण नाना पाटेकरांची कहाणी केवळ ‘अभिनेता’ या एका शब्दात संपत नाही. नाना पाटेकर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा धारदार आवाज, तीव्र नजर आणि संवादफेकीची अनोखी शैली.

‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘नटसम्राट’ यांसारख्या भूमिकांनी त्यांनी अभिनयाची स्वतःची एक स्वतंत्र भाषा तयार केली. त्यांच्या अभिनयाला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले. पद्मश्रीनेही त्यांचा गौरव झाला. मात्र त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी भूमिका कदाचित कॅमेऱ्यासमोरची नव्हती. ती होती माणसासाठी उभं राहण्याची. 2015 मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या पाहताना नाना पाटेकर अस्वस्थ झाले.

एका शेतकरी कुटुंबाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. नवी आलिशान गाडी घेण्यासाठी त्यांनी आणि मित्राने मोठी रक्कम बाजूला ठेवली होती. पण शेतकरी कुटुंबांची परिस्थिती पाहिल्यानंतर त्या पैशांचा उपयोग वेगळ्या कामासाठी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ग्रामीण भागात जाऊन शेतकरी कुटुंबांना मदत करण्यास सुरुवात केली.

मदत करण्यासाठी गेलेला हा अभिनेता नंतर त्या लोकांच्या आयुष्याचा भाग बनला. 2015 मध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून ‘नाम फाउंडेशन’ची सुरुवात झाली. दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी आत्महत्यांच्या संकटाला सामोरं जाणं हा या संस्थेच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला. नाम फाउंडेशनच्या अधिकृत माहितीनुसार, संस्थेच्या कामातून आतापर्यंत 77 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 49 हजारांहून अधिक विधवांना मदत करण्यात आली आहे.

हजारो गावांमध्ये जलसंधारणाची कामं करण्यात आली आहेत. 198 नद्यांच्या पुनरुज्जीवनासह नाले, बंधारे, शेततळी आणि पाण्याशी संबंधित अनेक प्रकल्प राबवण्यात आले आहेत. नाना पाटेकरांसाठी ही मदत केवळ पैशांची नव्हती. पाण्याचा प्रश्न सुटला, तर शेतकऱ्याच्या हातात पुन्हा काम येईल आणि त्याचं आयुष्य उभं राहू शकेल, हा त्यांच्या कामामागचा दृष्टिकोन होता. 2026 मध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागाबद्दल बोलताना नाना पाटेकर यांनी शहरापेक्षा गावांमध्ये आपल्याला अधिक जिवंतपणा जाणवतो, असं सांगितलं होतं.

गावातील एखाद्या व्यक्तीने पाठीवर हात ठेवला की वडिलांचा स्पर्श जाणवतो, अशा भावनेतून त्यांनी ग्रामीण समाजाशी असलेलं नातं व्यक्त केलं होतं. हेच कदाचित नाना पाटेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. ज्याने पडद्यावर अनेकदा सामान्य माणसाचा राग व्यक्त केला, तोच माणूस पडद्याबाहेर त्याच्या दुःखात सहभागी झाला. निधनाच्या काही दिवस आधी, 4 ऑक्टोबरला गोव्यातील एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी मृत्यूबद्दल बोलताना एक वाक्य उच्चारलं होतं, आपण उद्या इथे असू की नाही, हे माहीत नसतं.

त्यांच्या या शेवटच्या सार्वजनिक वक्तव्याकडे आज मागे वळून पाहताना त्याला एक वेगळीच भावनिक किनार मिळते. आयुष्य किती आहे यापेक्षा, आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी आपण प्रयत्न केले का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. कदाचित नाना पाटेकरांचं आयुष्य या प्रश्नाचंच उत्तर आहे. नाना पाटेकर यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी अभिनेता गमावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना नाना यांच्या अभिनयातील तीव्रता, वेगळेपण आणि प्रभावाचा उल्लेख केला आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान मोठं असल्याचं म्हटलं.

पण नानांची खरी आठवण कदाचित पुरस्कारांच्या कपाटात किंवा गाजलेल्या संवादांमध्ये नसेल. ती एखाद्या शेतकऱ्याच्या शिवारात असेल. एखाद्या पुन्हा जिवंत झालेल्या नदीच्या प्रवाहात असेल. एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आलेल्या समाधानात असेल. कदाचित त्या माणसाच्या मनात असेल, ज्याला आयुष्याच्या कठीण क्षणी कुणीतरी हात दिला होता. पडद्यावरचा नाना आज शांत झाला. पण माणुसकीसाठी त्याने दिलेली हाक अजूनही ऐकू येते… म्हणूनच नाना पाटेकर यांचा शेवट हा एका अभिनेत्याचा अंत नाही; तो एका अशा माणसाच्या आठवणींची सुरुवात आहे, ज्याने प्रसिद्धीच्या प्रकाशापेक्षा माणसाच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याला अधिक महत्त्व दिलं.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे