
Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त संस्थेचा दशकपूर्ती समारंभी पुण्यात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित काही पाहुण्यांशी अनौपचारिक संवाद साधताना नाना पाटेकरांनी त्यांच्या निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “मला आता निवृत्ती हवी आहे. मी नाटक, चित्रपटांमधून 99 टक्के निवृत्ती घेतोय. एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती करीनही. पण आता मला माझ्या पद्धतीनं जगू द्या”, असं वक्तव्य नानांनी यावेळी केलं. नाना पाटेकर हे वयाच्या 13 व्या वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे आता काहीतरी वेगळं करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना म्हणाले, “मी वयाच्या 13 व्या वर्षापासून काम करतोय. आता मी वयाची पंच्याहत्तरी गाठली आहे. त्यामुळे आता काहीतरी वेगळं.. जे आवडतंय, ते मनापासून करावंसं वाटतंय.. ते करेन. शेवटी कुठेतरी आपण थांबायचं असतं. एक जानेवारीला मी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करेन. त्यानंतर नाटक, चित्रपटांमधून निवृत्त होऊन गावखेड्यातील लोकांसाठी काहीतरी काम करेन. नाम फाऊंडेशनची धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी. कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच.”
यावेळी त्यांनी ‘नाम फाऊंडेशन’ची जबाबदारी सांभाळण्याबाबतही वक्तव्य केलं. या संस्थेची जबाबदारीही आता मकरंद अनासपुरे यांनी सांभाळावी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. “नाम फाऊंडेशनच्या कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. या संस्थेचं पुढचं काम मकरंद ठरवेल. मी असेन तरंच काम करीन, ही त्याची भूमिका चुकीची आहे. नाम फाऊंडेशनसारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या, तरी समस्या सुटणार नाहीत”, असंही ते म्हणाले.
“मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे. गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. नाम फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली. हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 60 लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं ‘नाम’तर्फे झाली आहेत,” असं नानांनी या कार्यक्रमात सांगितलं.
नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्यात केंद्रीय रस्ते परिवन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मभूषण डॉ. विजय भटकर (संगणक शास्त्रज्ञ), उदय सामंत (उद्योग/मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज ) आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.