‘मला त्या दोघांसाठी आनंद…’ आमिर खानच्या कथित गर्लफ्रेंडवर निखतचे पहिल्यांदाच विधान

आमिर खानच्या बहिणी निखत खानने त्यांच्या भावाच्या म्हणजे आमिरच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या संदेशात आमिर आणि त्यांच्या कथित गर्लफ्रेंड गौरी यांच्या नात्यावर भाष्य केलं. तिचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय होत आहे. निखतच्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मला त्या दोघांसाठी आनंद... आमिर खानच्या कथित गर्लफ्रेंडवर निखतचे पहिल्यांदाच विधान
Nikhat Khan Blessed Aamir Khan and Gauri
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 10:19 AM

आमिर खानने 14 मार्च रोजी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या चाहत्यांनी तसेच त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सगळ्यांमध्ये आमिरच्या बहिणीच्या एका वाक्याची बरीच चर्चा होत आहे. आमिरची बहीण निखत खानने त्याला एक सुंदर संदेश दिला आहे आणि याद्वारे तिने आमिरची कथित गर्लफ्रेंड गौरीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आमिरसोबत घालवलेले बालपण आणि त्याच्या स्टारडमपर्यंतच्या प्रवासाबद्दलही तिने आपले मत व्यक्त केले आहे.

“मला दोघांसाठी आनंद होतोय”

गौरी आणि आमिरच्या नात्याबद्दल निखतने एका मुलाखतीत एक वक्तव्य केलं आहे, ती म्हणाली की, ‘मला दोघांसाठी आनंद होत आहे आणि नेहमीच त्यांच्यासाठी चांगल्याचं भावना असतील. मला विश्वासच बसत नाहीये की आमिर 60 वर्षांचा झाला आहे. आपण सर्वजण मोठे होत आहोत. पण, जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला अनेक सुंदर आठवणी दिसतात.” असं म्हणत तिने गौरी आणि आमिरच्या नात्यावर स्पष्टपणेच भाष्य केलं आहे.

“आमिर हुशार होता…..”

निखत पुढे म्हणली की, ‘मला तो दिवस आठवतो जेव्हा आमिर आणि फैजल गणवेशात शाळेत जायचे. लवकर उठून शाळेत जायचे. एके दिवशी अम्माने सांगितले की घरी गाडी असल्याने त्यांनी गाडीने शाळेत जावं. बाबा शाळेत जाण्यासाठी मैलभर चालत जायचे, म्हणून त्यांना त्यांच्या मुलांनीही तेच करावे असे वाटत होते. लहानपणी आमिर हा हट्टी स्वभावाचा होता. मला आठवतंय की आम्ही गाडी चालवायला शिकलो होतो. गाडी मोकळी दिसली की आम्हाला ती चालवायची इच्छा व्हायची. आमच्यात स्पर्धा असायची की कोण आधी गाडी चालवणार. आमिर हुशार होता. त्याच्याकडे चाव्या होत्या, तर मला ड्रायव्हरची सीट मिळाली. आम्ही 20 ते 30 मिनिटे तसेच बसून राहिलो. आमिर गाडी चालवण्याच्या निर्णयावर ठाम राहिला अखेर मी हार मानली आणि आमिरला ड्रायव्हरची सीट दिली” अशा पद्धतीने तिने तिच्या आणि आमिरच्या बालपणीच्या आठवणींबद्दलही सांगितलं.

“भाऊ असावा तर आमिरसारखाच”

निखत म्हणाली, ‘आमिरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाहत्यांचे फोन आम्हाला उत्साहित करायचे. ती खूप छान भावना होती. आम्हाला आमच्या भावाचा अभिमान होता. पण जसजसे कॉल वाढू लागले, विशेषतः रात्री उशिरा, तसतसे आम्हाला त्रास होऊ लागला. संपूर्ण घर जागं व्हायचं. जर असा भाऊ असेल तर तो आमिर सारखाच असावा. आमिरचा मला खूप अभिमान आहे” असं म्हणत निखतने भावाबद्दल कौतुक करत त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.