
‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेतील भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विभू राघवने सोमवारी अखेरचा श्वास घेतला. विभूचं मूळ नाव वैभव कुमार सिंह राघव असं होतं. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून तो कॅन्सरशी झुंज देत होता. विभूला स्टेज 4 कोलन कॅन्सरचं निदान झालं होतं. विभूच्या निधनाने टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘बिग बॉस 18’चा विजेता आणि टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. विभूने ‘सावधान इंडिया’सह इतरही अनेक मालिका आणि शोजमध्ये काम केलं होतं. 2022 मध्ये त्याला कोलन कॅन्सरचं निदान झालं होतं. सोशल मीडियाद्वारे तो आरोग्याचे विविध अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करायचा.
विभूवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या निधनाच्या काही दिवस आधी अभिनेत्री सिंपल कौल, अदिती मलिक आणि इतरांनी सोशल मीडियावर त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती. सिंपलने 27 मे रोजी भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘आमचा मित्र, सहअभिनेता आणि रेस्टॉरंटमधील आमचा सहकारी राहिलेला विभू आमच्यासाठी कुटुंबापेक्षा जास्त आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तो नानावटी रुग्णालयात स्टेज 4 कॅन्सरशी झुंज देत आहे. त्याला या त्रासातून जाताना पाहणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. तो अत्यंत धाडसाने कॅन्सरशी लढत आहे. परंतु आमच्याकडचा निधी संपला असून त्याच्या पुढील उपचारासाठी तात्काळ निधीची आवश्यकता आहे’, अशी पोस्ट तिने लिहिली होती.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री कावेरी प्रियमने इन्स्टा स्टोरीमध्ये विभूचा फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तर करणवीर मेहराने लिहिलंय, ‘खूप लवकर गेलास मित्रा, तुझ्या आत्म्याला शांती मिळो.’ विभूच्या निधनानंतर सिंपलने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझ्या प्रिय मित्रा, तुझी खूप आठवण येईल. तू जिथे कुठे असशील तिथे खुश राहा’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
विभूने 17 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट लिहिली होती. ‘एकावेळी एक दिवस’ असं कॅप्शन देत त्याने स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला होता. कठीण दिवसांतही त्याची ताकद आणि दृढनिश्चय पाहून चाहते आणि सहकलाकार भारावून गेले होते. या पोस्टवर अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता.