
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला होता. त्यांना त्यांचा धर्म विचारून तर काहींना कलमा वाचायला सांगून दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. हिंदू पर्यटकांवर त्यांनी निशाणा साधला होता. या घटनेनंतर भारताने पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली. अशातच आता कॉमेडियन गौरव गुप्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो पाकिस्तानी चाहत्यावर उपरोधिक टिप्पणी करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर गौरवने त्याला हनुमान चालीसा पठण करण्यास सांगितलं आहे.
गौरव गुप्ता सध्या अमेरिका आणि कॅनडामध्ये त्याचे शोज करत आहे. सोशल मीडियावर त्याने शिकागोमधील शोचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो प्रेक्षकांना विचारतोय की त्यात कोणी पाकिस्तानीही आहेत का? त्यावर एकाने होकारार्थी उत्तर देताच गौरवने त्याला त्याच्याबद्दल विचारलं. गौरवच्या शोमध्ये पाकिस्तानी चाहत्याने नमस्कार करताच प्रेक्षकांमधून आधी ‘सिंदूर-सिंदूर’ अशा घोषणा होऊ लागल्या. यादरम्यान गौरवने त्यांना शांत राहण्यास आणि सभ्यतेने वागण्यास सांगितलं.
गौरवने त्या पाकिस्तानी प्रेक्षकाला म्हटलं, “भावा, तुझ्यात खूप धाडस आहे की तू इथे आलास. कलाकारांवर बंदी घातली तरी काही समस्या नाही, प्रेक्षकांना तरी परवानगी आहे. चल आता तू हनुमान चालीसा वाच. भाऊ म्हणतोय की मी शिकून आलोय.” हे ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो. त्यानंतर गौरव त्या पाकिस्तानी चाहत्याला त्याचं नाव विचारतो. तेव्हा तो हसन असं सांगतो. यावर गौरव लगेच विचारतो “कोड नेम काय आहे?” या विनोदावर पुन्हा प्रेक्षक हसू लागतात. शेवटी गौरव काश्मीरचा अप्रत्यक्ष उल्लेख करत म्हणतो, “तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला नाही मिळणार. इतक्या वर्षांपासून आम्ही सांगतोय की नाही मिळणार, नाही मिळणार. तरीपण तुम्ही येता.”
गौरव गुप्ताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी याकडे फक्त विनोद म्हणून पाहिलंय, तर काहींना त्याची मस्करी आवडली नाही. भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव असताना अशा पद्धतीचे विनोद करू नये, असं काहींनी म्हटलंय. ‘जो प्रेक्षक तुझ्या कलेसाठी आलाय, त्याची अशी बदनामी करू नये’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलंय.
गौरवने 2017 मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये भाग घेतला होता. याशिवाय तो ‘नॉट जस्ट बनिया’ आणि ‘मार्केट डाऊन’ यांसारख्या शोमध्येही झळकला आहे. मध्यमवर्गीयांचं आयुष्य व्यंगात्मक पद्धतीने विनोदाच्या रुपात मांडल्याने त्याला सोशल मीडियावर खास लोकप्रियता मिळाली.