‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने भारताचे 6 फायटर जेट पाडले? CDS जनरल चौहान यांनी सांगितलं सत्य
भारताची काही लढाऊ विमानं पाकिस्तानने पाडली असं संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी मान्य केलं. त्याचवेळी भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संपूर्ण चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताची काही लढाऊ विमानं पाकिस्तानने पाडली, असं संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी पहिल्यांदाच मान्य केलं. मात्र याविषयीचे अधिक तपशील त्यांनी दिले नाहीत. शनिवारी त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली. किती विमानांचं नुकसान झालं त्यापेक्षा ते का झालं हे शोधून काढणं अधिक महत्त्वाचं होतं, असं ते म्हणाले. त्याचवेळी भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संपूर्ण चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जनरल चौहान हे ‘शांगरी-ला डायलॉग’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले आहेत. तिथे त्यांनी ‘ब्लूमबर्ग टीव्ही’ला मुलाखतीत दिली होती.
संघर्षादरम्यान दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होण्याचा धोका कधीही निर्माण झाला नव्हता, असंही जनरल चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं. या मुलाखतीत त्यांना पाकिस्तानबरोबर झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षात भारताने काही लढाऊ विमानं गमावली का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जनरल चौहान म्हणाले, “विमानांचं नुकसान का झालं हे शोधणं अधिक महत्त्वाचं होतं, जेणेकरून भारतीय सैन्याला आपल्या डावपेचांमध्ये सुधारणा करता येतील आणि पुन्हा हल्ला करता येईल. त्यानुसार आम्ही डावपेचांमधील चुका समजून घेतल्या, त्या दुरुस्त केल्या आणि पाकिस्तानातील एअरबेसेसवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले. त्यांच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणा आम्ही भेदल्या आणि अचूकपणे हल्ले केले.” यापूर्वी भारतीय हवाई दलाचे डीजीएओ एअर मार्शल ए. के. भारती यांनी 11 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लढाऊ विमानांचं नुकसान झालं, अशी कबुली दिली होती. मात्र हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे परत आल्याचं सांगितलं होतं.
संघर्षाच्या काळात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अणुयुद्धाच्या जवळ पोहोचले होते हा अमेरिकेचा आणि इतर पाश्चात्त्य देशांचा दावा जनरल चौहान यांनी फेटाळून लावला. “माझं वैयक्तिक मत असं आहे की संघर्ष होतो तेव्हा सैन्यातील लोक सर्वाधिक तार्किक असतात. या ऑपरेशनदरम्यान दोन्ही बाजूंनी विचारांमध्ये तसंच कृतींमध्ये मला मोठ्या प्रमाणात तार्किकता दिसून आली. त्यामुळे आण्विक बाबतीत दोन्हीपैकी एक बाजू अतार्किकपणे वागेल असं आपण का गृहीत धरायचं?”
यावेळी जनरल चौहान यांनी चीनने पाकिस्तानला मदत केली का, यावरही आपलं मत मांडलं. चीन हा पाकिस्तानचा मित्र देश असला तरी संघर्षादरम्यान चीनने पाकिस्तानला प्रत्यक्ष मदत केल्याचं दिसलं नाही, असं जनरल चौहान यांनी स्पष्ट केलं. चीनने पाकिस्तानला उपग्रहांच्या प्रतिमा किंवा गोपनीय माहिती पुरवली असेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना, अशा प्रतिमा व्यावसायिकरित्या उपलब्ध असतात आणि चीन किंवा अन्य देशांकडूनही घेता येतात असं त्यांनी सांगितलं.
