
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अविनाश तिवारीच्या लूकने आणि नाना पाटेकर यांच्या स्टाइलने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या चित्रपटासाठी शाहिदने तगडं मानधन स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. त्याचसोबत ‘ओ रोमिओ’मधील इतर कलाकारांच्या फी चा आकडा चर्चेत आला आहे. या चित्रपटात शाहिद कपूरने हिटमॅन उस्तराची भूमिका साकारली आहे. अफशासाठी तो प्रेम, फसवणूक आणि सूडाच्या खेळात अडकतो. रिपोर्ट्सनुसार, शाहिदने या चित्रपटासाठी तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय.
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी यामध्ये शाहिदची हिरोइन अफशाची भूमिका साकारतेय. अफशा ही अत्यंत निरागस तरुणी असते, जिचं आयुष्य अचानक बदलतं. या भूमिकेसाठी तिने 6 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. ‘अॅनिमल’नंतर तृप्ती चांगलीच चर्चेत असून तिला बऱ्याच मोठमोठ्या चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेता अविनाश तिवारी एका क्रूर खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या हेअर स्टाइलपासून संपूर्ण लूक यामध्ये पूर्णपणे वेगळा आहे. ‘ओ रोमिओ’साठी अविनाशला 7 कोटी रुपये फी मिळाली आहे.
‘आयटम साँग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया या चित्रपटात राबियाची भूमिका साकारतेय. विशेष म्हणजे तमन्नाला या चित्रपटासाठी तृप्तीपेक्षाही अधिक मानधन मिळालं आहे. तिने सात कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. तर अभिनेत्री दिशा पटानी यामध्ये डान्सर जूलीच्या भूमिकेत आहे. तिला जवळपास दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे. दिशानेही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
‘ओ रोमिओ’मध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे इस्माइल खानची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात ते अत्यंत अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यासाठी त्यांना चार कोटी रुपये मानधन मिळाल्याचं समजतंय. या चित्रपटावरून वादसुद्धा निर्माण झाला आहे. हुसैन उत्सराची मुलगी सनोबर शेखने निर्मात्यांना एक पत्र पाठवत त्यांच्यावर आरोप केला आहे. सनोबरच्या वडिलांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असून त्याबद्दल कुटुंबीयांकडून परवागनी घेतली नसल्याची तक्रार तिने केली आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्येही हे स्पष्ट करण्यात आलं आहे की हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.