ठाण्यात 3 BHK घेता येईल इतकी ओरीच्या छोट्याशा बॅगची किंमत, 300 कोटी संपत्ती असणारा रोहित शेट्टीही थक्क
अरे बापरे! सोशल मीडियावर हटके स्टाईलने चर्चेत असणारा ओरी सध्या त्याच्या अलिशान बॅगमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बॅगची किंमत ऐकून रोहित शेट्टी देखील थक्क झाला आहे.

सोशल मीडियावर आपल्या अनोख्या स्टाईल, सेलिब्रिटींसोबतच्या मैत्री आणि आलिशान जीवनशैलीमुळे कायम चर्चेत असलेला ओरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी’मध्ये सहभागी झाला असून यावेळी त्याच्या स्टंटपेक्षा त्याच्यासोबत असलेल्या महागड्या बॅगनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात ओरी स्टंटसाठी येताना त्याच्या हातात हर्मीस या जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँडची गुलाबी रंगाची साइड बॅग दिसली. या बॅगची किंमत ऐकून केवळ स्पर्धकच नाही तर शोचा होस्ट रोहित शेट्टीदेखील अवाक झाला.
75 लाखांच्या बॅगची रंगली चर्चा
कार्यक्रमादरम्यान रोहित शेट्टीने ओरीला मिश्कील अंदाजात विचारले की, ‘तुझ्याकडे 71 लाख रुपयांची बॅग आहे, असं ऐकलंय.’ त्यावर ओरीने लगेच दुरुस्ती करत, ’71 नाही, ही बॅग तब्बल 75 लाख रुपयांची आहे’ असे सांगितले. इतकी मोठी किंमत सांगितल्यानंतर त्याने हसत आपल्या तोंडावर हात ठेवला.
ओरीचे उत्तर ऐकून रोहित शेट्टीही गंमतीने, ‘ही कुठून चोरून आणलीस?’ अशी टिप्पणी केली. त्यावर सेटवरील वातावरण एकदम हलकेफुलके झाले. स्पर्धक अविनाशनेदेखील विनोद करत, ‘इतके पैसे तर हा शो जिंकल्यानंतरही मिळणार नाहीत’ अशी प्रतिक्रिया दिली.
आधी 22 हजार, मग 22 लाख… आणि शेवटी 75 लाख!
या संवादादरम्यान रोहित शेट्टीने बॅगच्या किमतीबद्दल विचारले असता, ओरीने सुरुवातीला ’22 हजार रुपये’ असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने हसतच ’22 लाख’ अशी किंमत सांगितली. पुढे गंमतीतच त्याने ही बॅग ‘एका किडनीच्या किंमतीइतकी महाग’ असल्याचेही म्हटले. अखेरीस बॅगची वास्तविक किंमत सुमारे 75 लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
एका पार्टीसाठी लाखोंचे मानधन?
विविध माध्यमांतील अहवालांनुसार, ओरी एखाद्या खासगी पार्टी किंवा इव्हेंटमध्ये उपस्थित राहण्यासाठी 15 ते 25 लाख रुपये मानधन घेतो. मात्र, या मानधनाबाबत अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.
‘खतरों के खिलाड़ी’मध्ये स्टंटसोबतच ओरीच्या महागड्या वस्तू आणि आलिशान जीवनशैलीचीही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः 75 लाख रुपयांच्या हर्मीस बॅगने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली असून त्याची ही स्टाईल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.