
अभिनेत्री तारा सुतारिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता वीर पहारियासोबत नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर या दोघांना विविध कार्यक्रमांमध्येही एकत्र पाहिलं जातंय. नुकतेच हे दोघं प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला उपस्थित होते. ताराने या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लोंसोबत स्टेजवर परफॉर्म केलं, त्याच्यासोबत डान्स केला. यावेळी एपीने तिला सर्वांसमोर मिठी मारली आणि गालावर किस केलं. हे सर्व घडताना प्रेक्षकांमध्ये उभा असलेल्या वीरचा जळफळाट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इतकंच नव्हे तर वीर ताराशी ब्रेकअप करणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. आता इन्फ्लुएन्सर आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ऑरी याने कॉन्सर्टमधील खरा व्हिडीओ शेअर केला आहे.
ऑरीने त्याच्या इन्स्टाग्रामवर कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये वीर पहारियाची खरी प्रतिक्रिया दिसत आहे. जेव्हा स्टेजवर एपी आणि तारा परफॉर्म करत होते, मिठी मारत होते, तेव्हा वीर प्रेक्षकांमध्ये एंजॉय करताना, हसताना, नाचताना दिसून येत होता. ‘जे मीडिया तुम्हाला दाखवणार नाही, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. रिअल-टाइम फुटेज’ असं कॅप्शन ऑरीने या व्हिडीओला दिलं आहे. ऑरीचा हा व्हिडीओ वीर आणि ताराने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत ‘सत्य’ असं लिहिलं आहे.
आणखी एका कंटेंट क्रिएटरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत ताराच्या विरोधात कंटेंट बनवण्यासाठी पैसे वाटले जात असल्याचा खुलासा केला. हा व्हिडीओ ताराने तिच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘हे सर्व हाइलाइट करण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी धन्यवाद. हे सर्व पैसे देऊन एडिट करवून घेतले आहेत. माझा अपमान करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं आहे. हे अत्यंत घृणास्पद आहे की त्यांनी शेकडो कंटेंट क्रिएटर्स आणि हजारो मीम पेजेसना पाठवण्यासाठी अपमानास्पद कॅप्शन आणि चर्चेच्या पॉईंट्सची एक यादीच तयार केली होती. हे सर्व माझं करिअर आणि नातं उद्ध्वस्त करण्यासाठी केलंय का? या सर्वांची खिल्ली उडवणाऱ्यांचा चेहरा आता समोर येत आहे. त्यांच्यावरच ही मस्करी भारी पडतेय’, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलंय.