OTT Release: ‘एक दिवाने की दीवानियत’ ते ‘थमा’.. ओटीटीवर महा एंटरटेन्मेंट!
15 ते 21 डिसेंबरच्या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रंजक चित्रपट आणि वेब सीरिज स्ट्रीम होणार आहेत. यामध्ये 'एक दिवाने की दिवानियत', 'थमा', 'मिसेस देशपांडे' यांचाही समावेश आहे. हे कधी आणि कुठे स्ट्रीम होणार, त्याबद्दल जाणून घ्या..

15 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, झी5, जिओ हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफऑर्म्सवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ओटीटी सबस्क्राइबर्ससाठी हा आठवडा मनोरंजनाने परिपूर्ण असेल. यामध्ये ‘एमिली इन पॅरिस 5’ ही रोमँटिक सीरिज, ‘मिसेस देशपांडे’ हा मिस्ट्री ड्रामा आणि ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ हा कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर स्ट्रीम होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात..
मिसेस देशपांडे
‘मिसेस देशपांडे’ ही बहुप्रतिक्षित सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शक या सीरिजची कथा मिसेस देशपांडे या मुख्य पात्राभोवती फिरते, जी एक सर्वसामान्य गृहिणी वाटते, पण प्रत्यक्षात ती कुख्यात सीरिअल किलर असते. 19 डिसेंबरपासून ही सीरिज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
एक दिवाने की दिवानियत
मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये हर्षवर्धण राणे आणि सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका असून दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट 16 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
दाऊद
दाऊद हा एक तमिळ क्राइम कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये लिंगा नावाच्या एका टॅक्सी ड्राइव्हरची कथा दाखवण्यात आली आहे. एक सधा टॅक्सी ड्राइव्हर नंतर ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात कसा अडकतो, याची ही रंजक कथा आहे. हा चित्रपट 19 डिसेंबरपासून लायन्सगेट प्ले आणि ओटीटीप्ले प्रीमिअरवर स्ट्रीम होईल.
डॉमिनिक अँड द लेडीज पर्स
हा एक मल्याळम सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर आहे. डॉमिनिक या माजी पोलीस अधिकाऱ्याभोवती याची कथा फिरते. जो एक खाजगी गुप्तहेरसुद्धा असतो. एका महिलेच्या घरमालकाला सापडलेल्या पर्सच्या मालकाला शोधण्यासाठी तो एक केस हाती घेतो. या पर्सची चौकशी करताना अनेक रहस्ये, खून आणि धक्कादायक वैयक्तिक खुलासे होतात. 19 डिसेंबरपासून हा चित्रपट झी 5 वर स्ट्रीम होईल.
एमिली इन पॅरिस 5
या रोमँटिक कॉमेडी वेब सीरिजचा हा पाचवा सिझन आहे. यंदाच्या सिझनची कथा रोममध्ये घडताना दिसणार आहे. 18 डिसेंबर रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
रात अकेली है
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी यांच्यासही इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत. एका छोट्या शहरातील पोलीस अधिकारी जितिल यादव याच्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. 19 डिसेंबरपासून हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
फोर मोअर शॉट्स प्लीज 4
अत्यंत लोकप्रिय वेब सीरिजचा हा शेवटचा सिझन आहे. दामिनी, अंजना, उमंग आणि सिद्धी या चार मैत्रिणींची कथा यात दाखवण्यात आली आहे. 19 डिसेंबरपासून प्राइम व्हिडीओवर ही सीरिज पाहता येईल.
फॉलआऊट 2
एका व्हिडीओ गेमवर आधारित ही सायन्स फिक्शन सीरिज आहे. अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर आश्रयस्थानांमध्ये लपलेल्या, वाचलेल्या लोकांवर याची कथा आधारित आहे. ही सीरिज 17 डिसेंबरपासून प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.
थमा
आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
द ग्रेट इंडियन कपिल शो- सिझन 4
कॉमेडियन कपिल शर्माच्या या लोकप्रिय शोचा हा चौथा सिझन आहे. या सिझनमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा पाहुणी म्हणून येणार आहे. 20 डिसेंबरपासून हा शो नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
