मराठवाड्यातील ‘जलदूता’च्या आयुष्यावर चित्रपट; ‘पाणी’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणाऱ्या 'पाणी' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे.

मराठवाड्यातील जलदूताच्या आयुष्यावर चित्रपट; पाणीचा जबरदस्त टीझर पाहिलात का?
'पाणी'चा टीझर
Image Credit source: Youtube
| Updated on: Sep 15, 2024 | 10:15 AM

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या टीमने लालबागच्या राजाचं आशीर्वाद घेत ‘पाणी’चा टीझर लाँच केला. हा टीझर पाहून हनुमंत केंद्रे या महान व्यक्तीचं आयुष्य जवळून जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे स्वतः साकारणार असून यात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे. ‘पाणी’ची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती आहे, हे सर्वश्रुत आहे. इथले अनेक जण गाव सोडून जात असतानाच हनुमंत केंद्रे या तरुणाने तिथेच राहून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. गावात पाणी नाही म्हणून त्यांचं लग्नही होत नव्हतं. त्यांच्या आयुष्यातील हाच संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये त्यांची प्रेमकहाणीही दिसत आहे. आता ती पूर्ण होतेय का, गावात पाणी आणण्यात हनुमंत यांना यश येतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘पाणी’ हा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील.

या चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली, ”पर्पल पेबल पिक्चर्सच्या माध्यमातून आम्हाला अशा कथा प्रेक्षकांसाठी घेऊन यायच्या आहेत ज्या ऐकण्याची, जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा असेल. गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या कथा आम्हाला प्रेक्षकांसमोर घेऊन यायच्या आहेत आणि आमचा ‘पाणी’ चित्रपट असाच आहे. हा चित्रपट आमच्यासाठी खास आणि प्रासंगिक आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यापेक्षा चांगली सुरुवात अजून कोणती असू शकते?”

राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या म्हणाल्या, ”मराठी प्रेक्षक हे खूप चोखंदळ असतात. त्यामुळे एखादा चांगला विषय घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करावं, या प्रतीक्षेत आम्ही होतो आणि ‘पाणी’च्या माध्यमाने आम्हाला आमचा चित्रपट मिळाला. या निमित्ताने आम्ही पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या दोन नामांकित प्रॉडक्शन हाऊससोबत जोडले गेलो. चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज बाप्पाच्या साक्षीने आमचा टीझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचं याला भरभरुन प्रेम मिळत आहे. असंच प्रेम प्रेक्षकांनी चित्रपटावरही करावं.”

दिग्दर्शक आणि आदिनाथ कोठारे म्हणाला, ”आज चित्रपटातील हनुमंत केंद्रेचा लूक समोर आला असून टीझरही प्रदर्शित झालं आहे. हनुमंत केंद्रे हा चेहरा अवघ्या जगभरात पोहोचला असून त्याचं कर्तृत्व प्रेक्षकांना ‘पाणी’मधून अनुभवता येणार आहे. मला आनंद आहे, की एवढं मोठं व्यक्तिमत्व साकारण्याची संधी मला मिळाली आहे.”