
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यंदाचा पद्मपाणि पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलायाराजा (राज्यसभा सदस्य) यांना त्यांच्या भारतीय सिनेमा संगीतातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी इलायाराजा यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
समकालीन काळात संगीतामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असून संगीत वेगवान झाले आहे. वाद्यासह तयार होणारे संगीत हे आपल्या कानापर्यंत पोहचते मात्र, भावनांसह निर्माण होणारे संगीत हे हृदयापर्यंत पोहचते असे प्रतिपादन पद्मविभूषण इलायाराजा यांनी यावेळी केले.
दरम्यान, ११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजन रसूल पुक्कूट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन सी.एस.व्यंकटेश्वरन, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सचिन मुळे, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्यानंतर इलायाराजा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “मी कोणताही विचार न करता थेट संगीत लिहितो. आतापर्यंत १५४५ चित्रपटांसाठी काम केले असून या प्रवासात १५४५ दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत कार्य करण्याची संधी मला मिळाली आहे. मी संगीत तयार करीत असताना काहीही नवीन तांत्रिक गोष्टी वापरत नाही. मी संगीतावर सातत्याने काम करत असून आजही संगीत शिकत आहे. आज सकाळीच माझ्या १५४५ व्या चित्रपटासाठी संगीत तयार करून मी या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहिलो आहे. आज आपण पाहतो की, पियानोवर बोट ठेवलं की, संगीत तयार होत आहे. विशेषत: आज गावोगावी आणि घरोघरी संगीतकार आपल्याला पाहायला मिळतात. सराव, भावना आणि वाद्यापासून तयार होणारे संगीत सध्याच्या यांत्रिकतेच्या काळात मनाला भावणारे आहे. मला आज या ठिकाणी येऊन पद्मपाणि पुरस्कार स्वीकारत असताना मनापासून आनंद झाला आहे. या महोत्सवाला मी शुभेच्छा देतो.”
इलायाराजा यांच्याविषयी
पद्मविभूषण इलायाराजा यांनी नऊ भाषांमध्ये सुमारे ७ हजारहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. चेन्नईहून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो. या महोत्सवाचे इतिहाशी एक वेगळे नाते असून महोत्सवात पद्मपाणि, सुवर्ण कैलास असे विविध इतिहाशाची जोडणारे पुरस्कार दिले जातात. पुढच्या वर्षीपासून सुवर्ण शालीवाहन पुरस्कार मराठी चित्रपट स्पर्धेसाठी दिला जाणार आहे, असे संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले.