
‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेता दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे,त्याची तब्येत आता बरी असून त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली आहे. आसिफ खानने त्यांच्या आरोग्याची अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच, आजाराशी झुंजताना आणि रुग्णालयात असताना त्याला जीवनाचे महत्त्व काय आहे हे देखील कळल्याचं त्याने सांगितले.
‘आयुष्य किती लहान आहे’
आसिफ खान यांनी इंस्टाग्रामवर दोन स्टोरीज शेअर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले आहे – ‘गेल्या 36 तासांपासून हे पाहिल्यानंतर मला जाणवले की आयुष्य किती लहान आहे. कधीही एकही दिवस गृहीत धरू नका. एका क्षणात सर्व काही बदलू शकते. तुमच्याकडे जे काही आहे आणि तुम्ही जे काही आहात त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्यासाठी कोण सर्वात महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांना नेहमी जपा. जीवन ही एक अमुल्य भेट आहे आणि आपण भाग्यवान आहोत.’
आसिफ खानची प्रकृती आता कशी आहे?
आणखी एक गोष्ट शेअर करत, आसिफ खानने त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि तो बरा होत आहे. आसिफने म्हटलं आहे ‘गेल्या काही तासांत माझी प्रकृती ठीक नव्हती आणि मला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी बरा होत आहे आणि पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे. तुमच्या प्रेम, काळजी आणि शुभेच्छांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी लवकरच परत येईन. तोपर्यंत तुमच्या प्रार्थना आणि आठवणींमध्ये मला ठेवल्याबद्दल धन्यवाद.’
‘पंचायत’मध्ये जावई म्हणून चमकतोय आसिफ खान
प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय वेब सिरीज ‘पंचायत’ मध्ये आसिफ खानने ‘दामादजी’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
याशिवाय तो ‘पाताल लोक’ या मालिकेतही दिसला होता. सोबतच तो ‘काकुडा’ आणि ‘द भूतनी’ या चित्रपटांमध्येही दिसला होता.