‘पिंजरा’चं पर्व संपलं! प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन; सिनेसृष्टी सूवर्णकाळाच्या साक्षीदाराला मुकली

Sandhya Shantaram passed away : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा 'पिंजरा' हा सिनेमा तुफान गाजला होता.

पिंजराचं पर्व संपलं! प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन; सिनेसृष्टी सूवर्णकाळाच्या साक्षीदाराला मुकली
Sandhya Shantaram
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 04, 2025 | 2:35 PM

Pinjara fame Actress Sandhya Shantaram passed away : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा पिंजरामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. काल संध्या यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलाने दिली निधनाची माहिती

व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले’ असे किरण शांताराम यांनी सांगितले.

आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली

आशिष शेलार यांनी एक्स अकाऊंटवर संध्या शांताराम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!” असे त्यांनी म्हटले आहे.

संध्या यांचे सिनेमे

मराठी चित्रपटसृष्टीमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून ‘पिंजरा’ ओळखला जातो. या सिनेमातील बहारदार नृत्याने अभिनेत्री संध्या शांताराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एक नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर हा सिनेमा आधारिती होता. या चित्रपटातील संध्या यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली. आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते.