
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न होणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण हे लग्न अधिकृतपणे रद्द झाल्याची माहिती खुद्द स्मृतीने दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित स्मृतीने याबद्दलची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर पलाशनेही त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित आयुष्यात पुढे जाण्याविषयी म्हटलंय. लग्न रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर स्मृती आणि पलाश यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलोसुद्धा केलं. स्मृतीने तिच्या अकाऊंटवरून लग्नासंबंधीचे सर्व फोटो आणि व्हिडीओ आधीच काढून टाकले होते. परंतु पलाशच्या व्हिडीओवर अजूनही तिला प्रपोज करतानाचा व्हिडीओ पहायला मिळत आहे. आता या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
लग्नाच्या दोन दिवस आधी पलाशने स्मृतीला डी. वाय. पाटील स्टेडियमवर सरप्राइज देत प्रपोज केलं होतं. या प्रपोजलचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो व्हिडीओ अजूनही त्याच्या अकाऊंटवर पहायला मिळतोय. मात्र त्यावर आता कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तो डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे. ‘भावा, ही रील कधी डिलिट करतोय’ असा सवाल एकाने केला. तर ‘आता अधिकृतपणे लग्न मोडलंय, हा व्हिडीओ काढून टाक’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आता सर्व संपलंच आहे तर व्हिडीओसुद्धा डिलिट करून टाक’, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.
‘गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या खासगी आयुष्याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात आहेत आणि मला वाटतंय की यावेळी मी याबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे. मी अत्यंत खासगी व्यक्ती आहे आणि मला माझं आयुष्य असंच ठेवायचं आहे. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द करण्यात आलं आहे. मी हे प्रकरण इथेच संपवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांनाही हेच करण्याची विनंती करते. कृपया दोन्ही कुटुंबांच्या खासगीपणाचा आदर करा. आम्हाला आमच्या गतीने पुढे जाण्यासाठी वेळ द्या’, अशी पोस्ट स्मृतीने लिहिली आहे.
स्मृती आणि पलाश हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत लग्न करणार होते. परंतु लग्नाच्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नंतर जेव्हा कोरिओग्राफरसोबत पलाशचे फ्लर्टिंगचे चॅट्स लीक झाले, तेव्हा पलाशवर स्मृतीची फसवणूक झाल्याचा आरोप झाला.