
‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है..’ यासारखे डायलॉग आणि विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते विविध व्याधींनी त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी गेल्या पाच दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. असरानी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही असरानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘श्री गोवर्धन असरानी यांच्या निधनाने खूप दु:ख झालं. एक प्रतिभावान आणि खरोखरच विविधांगी भूमिका साकारणारे कलाकार. त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयकौशल्याने असंख्य लोकांच्या आयुष्यात आनंद आणि हास्य भरलं. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान नेहमीच जपलं जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,’ असं त्यांनी लिहिलंय.
Deeply saddened by the passing of Shri Govardhan Asrani Ji. A gifted entertainer and a truly versatile artist, he entertained audiences across generations. He particularly added joy and laughter to countless lives through his unforgettable performances. His contribution to Indian…
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2025
जयपूरमध्ये गुजराती कुटुंबात जन्मलेल्या गोवर्धन असरानी यांनी पुण्यातील ‘एफटीआयआय’मधून (FTII) अभिनयाचं शिक्षण घेतलं. 1967 मध्ये त्यांना ‘हरे काँच की चुडियाँ’ या हिंदी चित्रपटात पहिली भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी काही गुजराती चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 1970 च्या उत्तरार्धात असरानी यांच्या कारकिर्दीची लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ‘आज की ताजा खबर’, ‘रोटी’, ‘चुपके चुपके’, ‘छोटी सी बात’, ‘रफू चक्कर’, ‘शोले’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची चार्ली चॅप्लिनच्या पेहरावातील जेलरची भूमिका आणि डायलॉग्स लोकप्रिय ठरले. 1971 मध्ये ‘मेरे अपने’मधील असरानी यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. 1972 ते 1991 या काळात त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत 25 चित्रपट केले.
असरानी यांच्या कामाचा झपाटा इतका अधिक होता की सत्तर ते ऐंशीच्या दशकात नायकांची पिढी बदलत गेली तर असरानींचं चित्रपटातील स्थान आणि त्यांच्या भूमिका या दोन्हीला धक्का लागला नाही. त्यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या काळाचा साक्षीदार आणि विनोदाचा हुकुमी एक्का हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.