मी जिवंत आहे.. निधनाच्या चर्चांदरम्यान पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर

| Updated on: Feb 03, 2024 | 12:54 PM

अभिनेत्री पूनम पांडे जिवंत असून तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी खोटं बोलल्याचं तिने मान्य केलं आहे. पूनमच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

मी जिवंत आहे.. निधनाच्या चर्चांदरम्यान पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर
Poonam Pandey
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 3 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे. तिने खुद्द सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. याशिवाय आज दुपारी 1 वाजता ती सोशल मीडियावर लाइव्ह येऊन सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. “मी जिवंत आहे. माझं निधन सर्वाइकल कॅन्सरने झालेलं नाही. दुर्दैवाने मी त्या हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही, ज्यांनी सर्वाइकल कॅन्सरमुळे आपले प्राण गमावले आहेत. ते या आजाराविषयी काही करू शकत नाही, असा प्रश्न नाही. पण नेमकं काय करावं हेच त्यांना माहीत नाही,” असं ती या व्हिडीओत म्हणाली. शुक्रवारी सकाळी पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. या पोस्टमध्ये तिच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला होता. सर्वाइकल कॅन्सरने पूनमचं गुरुवारी रात्री निधन झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या पोस्टने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणली. अनेकांनी पूनमच्या निधनाबद्दल आणि सर्वाइकल कॅन्सरबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता पूनमचा व्हिडीओ समोर आला आहे.

“मी तुम्हाला इथे हेच सांगण्यासाठी आले आहे की इतर सर्वाइकल कॅन्सर हे रोखू शकता येतं. हे कॅन्सरच्या इतर प्रकारांसारखं नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट करावी लागेल आणि एचपीव्ही (HPV) व्हॅक्सिन घ्यावी लागेल. सर्वाइकल कॅन्सरने आणखी कोणाचे प्राण जाऊ नये म्हणून आपण एवढं आणि यापेक्षा अधिक प्रयत्न नक्कीच करू शकतो,” असं पूनम या व्हिडीओत पुढे म्हणाली.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘तुम्हा सर्वांसोबत मला काहीतरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा जीव गेला नाही. परंतु दुर्दैवाने या आजाराचा सामना कसा करावा याबद्दलची पुरेशी माहिती नसल्याने हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत. सर्वाइकल कॅन्सर हा पूर्णपणे टाळता येतो. एचपीव्ही (HPV) लस आणि तपासण्यांद्वारे हे शक्य आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करून एकमेकींना सशक्त करुयात आणि प्रत्येक स्त्रीला त्याबद्दलची माहिती देऊयात. ‘

इन्स्टाग्रामवर पूनमने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांची माफीदेखील मागितली आहे. “मला माफ करा ही मी हे इतकं टोकाचं पाऊल उचललं. पण त्यामुळे अचानक सर्वजण सर्वाइकल कॅन्सरबद्दल चर्चा करू लागले आहेत. त्यामुळे खोटं बोलण्यामागे माझा जो उद्देश होता, तो पूर्ण झाला आहे”, असंही तिने म्हटलंय.