
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर ती बऱ्यापैकी सक्रिय असून चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. प्राजक्ताचे बरेच फॅनपेजेससुद्धा आहेत. या फॅन पेजेसवर तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले जातात. तर कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयीची माहिती दिली जाते. परंतु एका फॅन क्लबवर शेअर केलेला स्वत:चा फोटो पाहून प्राजक्ता चांगलीच चिडली आहे. याविषयीने तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित चाहत्यांना खास विनंती केली आहे. या फॅन क्लबवर प्राजक्ताचा एआय जनरेटेड फोटो पोस्ट करण्यात आला होता.
सध्या एआयचा वापर सर्रास केला जात आहे. एआयच्या मदतीने सेलिब्रिटींची विविध फोटो एडिट किंवा मॉर्फ केले जातात. हे फोटो जरी खूप सुंदर दिसत असले तरी एआयचा दुरुपयोगही अनेकदा केला जातो. अनेक सेलिब्रिटींनी उघडपणे एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडीओंचा विरोध केला आहे. त्यात आता प्राजक्ता माळीचाही समावेश आहे. मी एआय जनरेटेड फोटो किंवा व्हिडीओंचं कधीच समर्थन करू शकत नाही, असं तिने स्पष्ट केलंय.
‘हा फोटो कितीही सुंदर दिसत असला तरी मी एआय जनरेटेडे फोटो आणि व्हिडीओचं कधीच कौतुक करणार नाही. मी माझ्या फॅन क्लब आणि इतर सर्वांना विनंती करते की त्यांनी एआय फोट बनवणं थांबवावं,’ अशी विनंती तिने केली आहे.
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, हृतिक रोशन, अनिल कपूर, करण जोहर, सुनील शेट्टी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी एआयच्या गैरवापराविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांचं रक्षण करण्यासाठी त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. एआयच्या मदतीने केले जाणारे डीपफेक, व्हॉइस क्लोनिंग यांविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे.
प्राजक्ता माळी चित्रपटांमध्ये सक्रिय असून तिचा दागिन्यांचा व्यवसायही चर्चेत आहे. ‘प्राजक्तराज’ हा तिच्या दागिन्यांचा ब्रँड आहे. शिवाय कर्जत इथं तिचं एक फार्महाऊस असून तेसुद्धा ती पर्यटकांना राहण्यासाठी भाडेतत्त्वावर देते. यातूनही प्राजक्ताची चांगली कमाई होते.