‘तारक मेहता..’ला आणखी एक धक्का; मराठमोळ्या अभिनेत्रीने सोडली मालिका, केले मोठे आरोप

आणखी एका अभिनेत्रीने 'तारक मेहता उल्टा चष्मा' या मालिकेला रामराम केला आहे. ही मराठमोळी अभिनेत्री या मालिकेत सुनीताची भूमिका साकारत होती. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने मालिकेच्या निर्मात्यांवर काही आरोप केले आहेत.

तारक मेहता..ला आणखी एक धक्का; मराठमोळ्या अभिनेत्रीने सोडली मालिका, केले मोठे आरोप
taarak mehta ka ooltah chashmah
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2025 | 2:08 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. परंतु गेल्या काही वर्षांत या मालिकेच्या निर्मात्यांवर त्यातील कलाकारांकडून बरेच आरोप झाले. या पार्श्वभूमीवर काहींनी मालिकेला रामराम केला. आता ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडणाऱ्या कलाकारांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता शिसोडे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ताने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर आरोपदेखील केले आहेत. प्राजक्ताने या मालिकेत सुनीताची भूमिका साकारली होती, जी गोकुळधाम सोसायटीमध्ये भाजी विकायला यायची.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. जिथे माझा अनादर केला जातो आणि मला अन्याय्य वागणूक दिली जाते, तिथे मी काम करू शकत नाही, असं तिने स्पष्ट केलं. प्राजक्ताने मालिकेतील तिच्या भूमिकेचा फोटो शेअर करत इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, ‘तुम्ही अशा लोकांसोबत काम करू नये जे तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत आणि जिथे तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाचं बलिदान द्यावं लागेल. तारक मेहता का उल्टा चष्मामधील सुनीताच्या भूमिकेसाठी धन्यवाद. मला माझ्या महिला मंडळाची खूप आठवण येईल.’

प्राजक्ताने कॅप्शनमध्ये असंही लिहिलंय, ‘बस झालं, आता पुरे’ आणि सोबत हात जोडण्याचा इमोज पोस्ट केला. तिने याआधी ‘तुळजा भवानी’ आणि ‘मटका किंग’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिथे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. प्राजक्ताच्या मालिका सोडण्याच्या पोस्टवरही नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. ‘सुनीताच्या भूमिकेची कमतरता जाणवेल, तुम्ही मालिका का सोडली’, असा सवाल एकाने केला. तर ‘मीसुद्धा 2020 पासून ही मालिका बघणंच बंद केलंय’, असं दुसऱ्याने लिहिलं.

याआधीही मालिकेतल्या काही कलाकारांनी निर्मात्यांवर बरेच आरोप केले होते. यात जेनिफर मिस्त्री, शैलेश लोढा यांचाही समावेश होता. निर्माते असित मोदी यांच्यावर जेनिफरने बरेच गंभीर आरोप केले होते. परंतु हे सर्व आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.